- संतोष ठाकूरनवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेनेसोबत आपल्या अटींवर युती करण्याची तयारी केलेल्या भाजपने तसे न घडल्यास पर्यायी व्यवस्थेचीही तयारी सुरू केली आहे. त्यानुसार राज्यात भाजपचे नेते व कार्यकर्ते येत्या दहा दिवसांत जवळपास तीन कोटींपेक्षा जास्त मतदारांना भेटतील. ही संख्या यावर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेला मिळालेल्या एकत्रित मतांपेक्षा जास्त आहेत. भाजपला वाटते की, बालाकोट, अनुच्छेद ३७० रद्द करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी घेतलेल्या कठोर निर्णयामुळे राज्यात स्वबळावर सत्ता मिळू शकते. या पार्श्वभूमीवर भाजपला स्वत:च्या सरकारची तयारी सुरू करायला हवी. युती झाली तर चांगलेच पण न झाली तर भाजप त्याला अधिक चांगले समजतो आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात १.४९ कोटींपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या संख्येपेक्षा ही मते एक लाखाने कमी आहेत. भाजपच्या एका नेत्याने म्हटले की, वेगवेगळ्या कारणांनी कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते १०० टक्के मतदान करीत नाहीत. परंतु, भाजपने हे पाहिले की आपल्या एकूण कार्यकर्त्यांच्या संख्येपेक्षाही जास्त मते गेल्या लोकसभा निवडणुकीत मिळाली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे की, फक्त भाजप कार्यकर्ताच नव्हे तर इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या विचारांच्या मतदारांनीही भाजपला मत दिले. याचा स्पष्ट संकेत हा आहे की महाराष्ट्रात सामान्य लोक नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावावर मते देत आहेत. या परिस्थितीत शिवसेनेने ठरवायचे आहे की, आपण भाजपसोबत राहू इच्छितो की स्वतंत्र? भाजपच्या वरिष्ठ नेत्याने म्हटले की, शिवसेनेला लोकसभा निवडणुकीत १.२५ कोटींपेक्षा जास्त मते मिळाली होती. भाजप आणि शिवसेना यांची मते एकत्र केली तर ती जवळपास २.७५ कोटी होतात. राज्यात आम्ही येत्या दहा दिवसांत औपचारिक आणि अनौपचारिकपणे तीन कोटींपेक्षा जास्त मतदारांशी संपर्ककरणार आहोत. अमित शहा यांचे महाराष्ट्रातील दोन दौरे पूर्ण झाले आहेत. येत्या दिवसांत अशा प्रकारच्या कार्यक्रमांची संख्या वाढवली जाईल. म्हणजे जास्त लोकांपर्यंत भाजपची धोरणे पोहोचवता येतील. आम्हाला आशा आहे की आम्ही महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक जिंकू शकतो.भाजपचा पदाधिकारी म्हणाला की, लोकसभा निवडणुकीत आम्ही जवळपास २७ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली होती. शिवसेनेला २३ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला १५ तर १६ टक्क्यांपेक्षा जास्त मते काँग्रेसला मिळाली होती. यातून हे स्पष्ट होते की राज्यात प्रमुख भूमिकेत कोणत्या पक्षाने यायला हवे.
Vidhan Sabha 2019: तीन कोटी मतदारांना भेटणार भाजप नेते; स्वबळावर सत्तेची आशा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 2:57 AM