यदु जोशीमुंबई : विधानसभा निवडणुकीत युती करताना कोणत्याही परिस्थितीत १५० पेक्षा कमी जागा घेणार नाही, अशी भूमिका भाजपने घेतल्याने आणि त्याचवेळी लहान मित्र पक्षांसाठी १८ जागा सोडण्याची तयारी दर्शविल्याने शिवसेनेच्या वाट्याला उर्वरित १२० जागा येतात. शिवसेना त्यासाठी राजी होत नसल्याने युतीच्या मार्गात बाधा निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वतीने शिवसेनेसमोर मांडण्यात आलेल्या प्रस्तावात असे नमूद करण्यात आले की गेल्यावेळी भाजपने १२२ जागा जिंकल्या होत्या. त्यापेक्षा काही जागा जादा यावेळी जिंकणे आवश्यक आहे. केंद्र व राज्यात सत्ता असलेल्या पक्षाला गेल्यावेळच्या यशाचीही पुनरावृत्ती करता आली नाही असे चित्र निकालात समोर आले तर ते पक्षाची मानहानी करणारे असेल.कोणताही पक्ष लोकप्रियतेच्या कितीही शिखरावर असला तरी त्याच्या यशाचे प्रमाण हे ८० टक्के इतके असते याकडे भाजपने शिवसेनेचे लक्ष वेधले असून त्यामुळेच किमान १२२ जागा जिंकायच्या तर १५० जागा लढाव्या लागतील असा तर्क दिला आहे. भाजपकडून शिवसेनेला हेही सांगितले जात आहे की २०१४ मध्ये शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या होत्या. आता त्यांनी १२० जागा लढविल्या आणि युतीची लाट असल्याचे लक्षात घेता ८० टक्के जागा जिंकल्या तरी त्यांचे ९५ आमदार निवडून येऊ शकतात.शिवसेनेचे त्यापेक्षा दहा जागा कमी आल्या तरी त्यांचे ८५ आमदार निवडून येतील. ही संख्या त्यांच्या मागील संख्याबळापेक्षा २२ ने जास्त असेल. भाजपला गेल्यावेळचे संख्याबळ टिकवून जादा दहा जागा जास्त जिंकायच्या तरी १५० पेक्षा कमी जागा लढवून चालणार नाही.शिवसेनेने १२० जागा लढविल्या तरी स्वत:कडील ६३ जागांव्यतिरिक्त ५७ जागा त्यांना लढायला मिळतात. जेव्हा की भाजपने १५० जागा लढल्या तर त्यांना स्वत:कडील १२२ जागांव्यतिरिक्त केवळ २८ जादा जागा लढायला मिळतात. त्यातही सहा विद्यमान आमदार आणिकाँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्यांची संख्या १४ इतकी आहे. ती गृहित धरल्यास नव्या केवळ १४ जागा लढण्याचा वाव भाजपला असेल.>मुख्यमंत्र्यांच्या चाणक्यनीतीची प्रतीक्षायुती करताना भाजपचा असा कोंडमारा होत असल्याने आणि त्याचवेळी शिवसेना १२० जागांवर समाधान मानण्यास तयार नसल्याने युतीचे घोडे अडले आहे. मात्र, महाजनादेश यात्रेवरून परतलेले मुख्यमंत्री चाणक्यनीती वापरून तोडगा काढतील, असा विश्वास भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे.
Vidhan Sabha 2019: भाजपची 150 जागांसाठी आग्रही भूमिका; सेनेला 120वरच थांबावे लागणार, युतीच्या मार्गात अडसर
By यदू जोशी | Published: September 20, 2019 4:56 AM