- धनंजय वाखारे नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीकडून मित्रपक्षांना १८ जागा देण्याची चर्चा सुरू असतानाच भाजपचा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाने दहा जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आठवले गटाने ५ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी तीन ठिकाणी शिवसेना, तर दोन ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे आता भाजप-सेना या जागा रिपाइंला सोडणार काय, असा प्रश्नही उपस्थित झाला आहे. त्यातही रिपाइंने ज्या दोन मतदारसंघांत पाच आकडी मते घेतली ते पिंपरी आणि चेंबूर हे दोन्ही मतदारसंघ सेनेकडे असल्याने रिपाइंला ते मिळण्याची शक्यता जवळपास मावळल्यातच जमा आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना-भाजप युती संपुष्टात आल्यानंतर रामदास आठवले यांच्या रिपाइंने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजपने रिपाइंला आठ जागा देण्याचे कबूल केले होते. प्रत्यक्षात रिपाइंने पाच जागांवर उमेदवार दिले. त्यातही चिमूर आणि वडगाव शेरी मतदारसंघात रिपाइंने उमेदवार देतानाच भाजपनेही उमेदवार उभे केले होते. उर्वरित विक्रोळी, चेंबूर आणि पिंपरी या मतदारसंघात भाजपने उमेदवार दिलेला नव्हता. चिमूरमधून हेमंत भाईसारे (४५५ मते), वडगाव शेरीमधून डॉ. सिद्धार्थ धेंडे (९२४७ मते), पिंपरीतून चंद्रकांत सोनकांबळे (४७२८८ मते), चेंबूरमधून दीपक निकाळजे (३६६१५ मते), तर विक्रोळीतून विवेक पंडित (६९७५ मते) हे कपबशी चिन्हावर निवडणूक लढले होते. चिमूरमधून भाजपचे बंटी भांगडिया विजयी झाले, तर रिपाइंचा उमेदवार १७ व्या क्रमांकावर राहिला. विक्रोळीतून शिवसेनेचे सुनील राऊत यांची सरशी झाली, तर रिपाइंचा उमेदवार पाचव्या क्रमांकावर होता. चेंबूरमधून शिवसेनेचे प्रकाश फातरेपेकर यांनी विजय मिळविला. रिपाइं तिसऱ्या स्थानावर राहिली. पिंपरी येथे शिवसेनेचे गौतम चाबूकस्वार विजयी झाले होते. येथेही रिपाइं तिसºया स्थानावर होती. वडगाव शेरीमधून भाजपचे जगदीश मुळक विजयी झाले होते. येथे रिपाइं सहाव्या स्थानावर होती. रिपाइंच्या पाचपैकी तीन ठिकाणी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.>२०१४ मध्ये मिळाली लाखभरच मतेनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने रिपाइंला एकही जागा दिली नव्हती. त्या बदल्यात केंद्रात रामदास आठवले यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रिपाइंला लढलेल्या पाचही जागा मिळून अवघी १ लाख ५८० मते मिळाली होती. त्यामुळे यंदाही रिपाइंच्या वाट्याला तीन ते चार जागा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आठवले यांनी विधानसभा निवडणुकीसाठी १० जागांची मागणी करत भाजपला पेचात टाकले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत रिपाइंला प्रत्यक्षात सोडलेल्या तीनही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे रिपाइंच्या पारड्यात कोणत्या जागा टाकायच्या याबाबत पेच निर्माण झालेला आहे. त्यातच शिवसेनेने भाजपला त्यांच्या मित्रपक्षांना भाजपच्याच कोट्यातून जागा सोडण्याचा आग्रह धरल्याने भाजपची कसोटी लागणार आहे.
Vidhan Sabha 2019 : आठवलेंच्या रिपाइंला सांभाळताना भाजपची कसरत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 4:07 AM