- संदीप प्रधान मुंबई : मनसैनिकांच्या दबावापोटी म्हणा किंवा ईडीच्या धाकाने म्हणा किंवा अस्तित्वाच्या लढाईकरिता, ठाकरेबंधूंमधील प्रेमापोटी म्हणा राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उभे करण्यास तयार झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० जागांवर उमेदवार उभे करणार, अशी चर्चा आहे. विधानसभेच्या २८८ जागा असून त्यापैकी केवळ १०० कोणत्या जागांवर मनसे लढणार ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच स्पष्ट होईल. त्यानंतरच मनसेच्या बदललेल्या भूमिकेमागील प्रेरणा कोण, ते स्पष्ट होईल.मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नाही. मात्र, राज यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला. त्यानंतरही अनुकूल निकाल न लागल्याने राज यांनी ईव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित केला. निकाल जर फिक्स असेल, तर निवडणुका कशाला लढवायच्या, असा सवाल करणाऱ्या राज यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना स्वत:कडील पैसे जपून वापरण्याचे आवाहन केले होते.राज यांच्या भाजपविरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांना ईडी चौकशीची नोटीस आली. त्यांचे निकटवर्तीय उन्मेष जोशी, राजन शिरोडकर व नितीन सरदेसाई यांनाही ईडीच्या कार्यालयात चकरा मारायला लागल्या. त्यावेळीच अशी चर्चा सुरू झाली होती की, सत्ताधारी भाजपने युती केली किंवा तोडली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मनसे रिंगणात हवी आहे. युती तोडल्यानंतर शिवसेनेच्या काही उमेदवारांच्या विरोधात मनसेचे उमेदवार रिंगणात असतील, तर मराठी मतांच्या विभाजनाचा लाभ भाजपच्या उमेदवारांना होऊ शकतो किंवा युती असतानाही शिवसेनेला मनसेच्या उमेदवारांमुळे झटका लागला, तर शिवसेना मागील वेळेसारखी ६३ जागांवर मजल मारणार नाही. त्यामुळे आता मनसेने शिवसेनेच्या मतदारसंघात उमेदवार दिले, तर या खेळीमागे भाजपचे चाणक्य असल्याचे स्पष्ट होईल.दुसरा तर्क असाही आहे की, राज हे निवडणूक लढवायला उत्सुक नव्हते, मात्र शिवसेनेने त्यांच्या व मनसेच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याचे लक्षात आणून दिल्याने राज यांनी लढायला अनुकूलता दाखवली आहे. ठाण्यातील नौपाडा येथील बिल्डर हसमुख शहा याने अलीकडेच राहुल पैठणकर या मराठी ब्राह्मण व्यक्तीला किरकोळ कारणावरून मारहाण केली. लागलीच मनसेने या वादात उडी घेत शहाला इंगा दाखवला. सध्या दोन्ही सेनांचा मुख्य शत्रू भाजप असून त्याचे नेतृत्व दोन गुजराती व्यक्ती करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहा याला इंगा दाखवण्यामागे शिवसेना व मनसे यांची आतून हातमिळवणी तर नाही ना, अशी शक्यताही नाकारता येत नाही.
Vidhan Sabha 2019: मनसेच्या बदललेल्या पवित्र्यामागे चाणक्यनीती की अदृश्य टाळी?
By संदीप प्रधान | Published: September 23, 2019 3:59 AM