- अतुल कुलकर्णीमुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आता १४७ जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस १२४ जागा लढवणार आहे. काँग्रेसने समाजवादी पक्षाला भिवंडी पूर्व, औरंगाबाद पूर्व आणि मानखुर्द हे तीन मतदारसंघ देण्याचे मान्य केल्यामुळे अबू आझमी आघाडीत सहभागी झाले. जागावाटपाचा तिढा सुटला असला तरी सीपीआयएम, सीपीआय, जनता दल यांच्या जागांबाबत वाद कायम आहे.शेकापचे नेते जयंत पाटील यांनी पेण, उरण, पनवेल, अलिबाग व रोहा या जागी फक्त राष्ट्रवादीसोबत आघाडी व काँग्रेसने आपले उमेदवार उभे करून मैत्रीपूर्ण लढाई करायची, अशी अट घातली आहे. शेकापला आघाडीत सहभागी करून घेण्याची अट मान्य करण्यात आली. आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी १२५ म्हणजेच २५० जागा लढवणार होते. तर ३८ जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार होत्या. मात्र मित्रपक्षांकडून मागणी कमी आली. त्यामुळे आयत्यावेळी काही मतदारसंघ बदलून घेत मित्रपक्षासह काँग्रेसने १५६ जागा लढविण्याचा निर्णय घेतला. यातील ९ जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. त्यात ३ जागा समाजवादी पक्षाला तर उर्वरित ६ जागा रिपाइं कवाडे गट आणि रिपाइं गवई गट यांना दिल्या जातील. त्यामुळे काँग्रेसकडे १४७ जागा उरतील.राष्ट्रवादी आता मित्रपक्षांसह १३२ जागा लढविणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातूनच राजू शेट्टी यांच्या स्वाभिमान शेतकरी संघटनेसह अन्य मित्रपक्षांना ८ जागा देण्यात येणार आहेत. बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष आघाडीसोबत अचलपूर आणि मुंबई अशा २ जागा लढेल. त्यामुळे राष्ट्रवादीकडे १२४ जागा असतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी शिरोळमधून लढतील.माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीतनाशिक जिल्हयातील भाजपाचे माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. कोकाटे यांना सिन्नर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
Vidhan sabha 2019 : आघाडीचं ठरलं; काँग्रेस १४७, राष्ट्रवादी १२४ जागांवर लढणार
By अतुल कुलकर्णी | Published: October 03, 2019 6:46 AM