मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असला तरी भाजपा आणि शिवसेना युतीचे घोडे जागावाटपावर अडले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील, असे स्पष्ट संकेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले.
मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को संकुल येथे कलम ३७० च्या मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील राजकीय वाटचालीबाबत स्पष्ट संकेत दिले. ''महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आणि विधानभा निवडणूक झाल्याने पुन्हा एकदा राज्याचे होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,'' असा उल्लेख अमित शहा यांनी केला. त्यामुळे राज्यात युती होवो अगर न होवे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याचा हाती राहतील, हे स्पष्ट झाले आहे.
अमित शहा म्हणाले की, ''काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमूक झाले तर आम्ही जिंकू, तमूक नाही झाले तर आम्ही जिंकू, असे गणित मांडत आहे. काहीही झाले तरी भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बहुमतासह भाजपाचे सरकार स्थापन होईल. महाराष्ट्राल एनडीएला तीन चतुर्थांश बहुमत मिळेल.''