नवी दिल्लीः महाजनादेश, जनआशीर्वाद, शिवस्वराज्य या यात्रा महाराष्ट्रभर फिरू लागल्यापासून ज्या घोषणेकडे सगळ्यांचेच कान लागले होते, ती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर झाली आहे. २०१४च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाची विधानसभा निवडणूकही एकाच टप्प्यात होणार असून २१ ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर ३ दिवसांनी, म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेत विधानसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. हरियाणा विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रासोबतच होणार आहे. दिवाळीच्या आधीच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्यानं दिवाळीआधी विजयाचे फटाके कोण फोडतो आणि कुणाचे फटाके फुसके ठरतात, हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे.
गणपती विसर्जनानंतर, अर्थात अनंत चतुर्दशीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होईल, असे अनेक नेत्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे १२ सप्टेंबरपासून सगळेच निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची वाट पाहत होते. अखेर आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला.
>> निवडणुकीची अधिसूचना जाहीर होण्याची तारीख - २७ सप्टेंबर २०१९
>> उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख - ४ ऑक्टोबर २०१९
>> उमेदवारी अर्जांची छाननी - ५ ऑक्टोबर २०१९
>>उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत - ७ ऑक्टोबर २०१९
>> मतदान - २१ ऑक्टोबर २०१९
>> मतमोजणी - २४ ऑक्टोबर २०१९
सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आणि इच्छुक उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे प्रमुख पक्ष स्वबळावर लढले होते. यावेळी मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली असून त्यांचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाला आहे. भाजपा आणि शिवसेनेचे नेते 'आमचं ठरलंय', असं म्हणत असले तरी त्यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असल्यानं युतीचं घोडं अडलं आहे. लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि ओवेसींचा एमआयएम हे पक्ष 'वंचित बहुजन आघाडी'च्या झेंड्याखाली एकत्र लढले होते. परंतु, या आघाडीत बिघाडी झाली असून एमआयएमनं भारिप बहुजनशी 'काडीमोड' घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेनं एकही जागा लढवली नव्हती. पण प्रचारात, राज ठाकरेंचं 'इंजिन'च सुस्साट धावलं होतं. आता ते विधानसभा निवडणुकीत काय करणार, स्वतः लढणार, अन्य कुणाचा प्रचार करणार की निवडणुकीपासून दूरच राहणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. येत्या काही दिवसांत सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील. उमेदवार याद्या, जाहीरनामे, प्रचारसभांना जोर येईल आणि काही दिवसांसाठी का होईना मतदार 'राजा' ठरेल.