कर्जत : आदित्य ठाकरे बेरोजगारमुक्त महाराष्ट्र करायचा म्हणतात. मग पाच वर्षे तुमच्या मंत्र्यांनी काय केले? उद्योग व पर्यावरण मंत्री तुमचेच होते ना? पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यात निर्णायक पंधरा कामे केली असतील ती त्यांनी दाखवावीत’ असे खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.कर्जतमध्ये शिवस्वराज्य यात्रेच्या अंतिम टप्प्यानिमित्त शेळके बंधू कार्यालयाच्या सभागृहात कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी डॉ. अमोल कोल्हे बोलत होते.‘मी पुन्हा येणार म्हणजेच मला मुख्यमंत्री करा असे म्हणत जनादेश यात्रा काढून फिरणारे राज्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच आपण पहात आहोत. पाच वर्षे काम केले असते तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती. बेरोजगारी, शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर या समस्या आहेतच. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल विचारले की, भारत माता की जय म्हणत यात्रा उरकायची. महाराष्ट्रात पाच वर्षांत काय चाललंय हे सर्वांना माहीत आहे. तरीही जनतेला गृहीत धरले जाते, हे दुर्दैव आहे. पाच वर्षांत ९८३ कारखाने बंद झालेत तर १ लाख ४२ हजार उद्योगधंदे बंद झालेत त्यामुळे अनेक लोक बेरोजगार झालेत, असेही कोल्हे म्हणाले.एक जनादेश यात्रा एक जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. एक म्हणतात मी परत येणार तर दुसरे म्हणतात मी फक्त आशीर्वाद घ्यायला आलोय आणि मागून म्हणतात यांना मुख्यमंत्री करा म्हणजे या स्वार्थाची यात्रा आहे. आमची यात्रा कुणाला मुख्यमंत्री करा हे सांगायला नाही तर शिवस्वराज्य आणण्यासाठी आहे. रयतेचे राज्य आणण्यासाठी आहे. सरकार भाजपचे, शिवसेनेचे की युतीचे आहे हे समजत नाही. चांगलं काम झालं की भाजपवाले म्हणतात आमचं सरकार, वाईट काम झालं की शिवसेना म्हणते भाजपचे सरकार आणि फायदा घ्यायचा असला की म्हणतात आमचे युतीचे सरकार. हे म्हणजे तुम्हाला वेडे बनविण्याचे काम सुरू आहे, असे कोल्हे म्हणाले. लोकसभेत सेनेच्या अगर कोणत्याच खासदाराने छत्रपती शिवरायांचे नाव घेतले नाही. मात्र मी ‘जय शिवराय’ म्हणून महाराष्ट्राची अस्मिता जागी ठेवल्याचे कोल्हे यांनी स्पष्ट केले.>प्रास्ताविकात दत्ता मसुरकर यांनी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील कर्जत आणि श्रीवर्धन विधानसभेच्या जागा आपल्याला लढवायच्या आहेत. उर्वरित ठिकाणी मित्रपक्ष उमेदवार उभे करणार आहे, असे स्पष्ट केले.आमदार सुरेश लाड म्हणाले, गेल्यावेळी यांनी सांगितलं आमचं सरकार आलं तर पेण अर्बन बँक शंभर दिवसात सुरू करू, पाच वर्षे झाली काय झालं? मी विरोधी पक्षाचा असल्याने जाणीवपूर्वक कामे रखडविली जातात. या वेळी त्यांना योग्य धडा शिकविण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा आह.तटकरे यांनी माझा मतदारसंघ हा नसला तरी माझ्या मतदारसंघापेक्षा काकणभर प्रेम या कर्जत मतदारसंघावर आहे. कर्जत - खोपोली लोहमार्गाचे दुहेरीकरण, कर्जत - पनवेल लोकलसेवा होण्यासाठी मी लोकसभेत पाठपुरावा करीन. कोंढाणे धरण झाले पाहिजे आणि तेही कर्जतकरांसाठी, असे स्पष्ट केले.अमोल मेटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आदित्य ठाकरे, रामदास आठवले यांच्या आवाजाची नक्कल करीत युती सरकारवर घणाघात केला. आमची पार्टी एनसीपी म्हणजे ‘न्यू कँडीडेट पार्टी’ आहे. या वेळी जनताजनार्दन चांगला विचार करून मतदान करील, असे सांगितले.
Vidhan Sabha 2019: पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यात किती निर्णायक कामे केली?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 6:06 AM