Vidhan Sabha 2019 : नेत्यांची अन् मतांची गळती कशी रोखणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 04:33 AM2019-09-19T04:33:28+5:302019-09-19T04:34:01+5:30

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या महागळतीमुळे आघाडीला २०१४ मध्ये मिळालेले पावणेदोन कोटी मतांचे गाठोडे टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार

Maharashtra Vidhan Sabha 2019 - How to prevent the leakage of leaders' votes? | Vidhan Sabha 2019 : नेत्यांची अन् मतांची गळती कशी रोखणार?

Vidhan Sabha 2019 : नेत्यांची अन् मतांची गळती कशी रोखणार?

googlenewsNext

- धनंजय वाखारे
नाशिक : भाजप-शिवसेनेला रोखण्यासाठी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या महागळतीमुळे आघाडीला २०१४ मध्ये मिळालेले पावणेदोन कोटी मतांचे गाठोडे टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेस व राष्टÑवादीने स्वतंत्रपणे लढताना दोन्ही मिळून १ कोटी ८६ लाख मते घेतली होती, तर भाजप-शिवसेनेनेही स्वतंत्र लढत २ कोेटी ४९ लाखांहून अधिक मते मिळविली होती.
२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली तसेच कॉँग्रेस-राष्टÑवादी आघाडीही दुभंगली होती. हे चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी भाजपने २६० जागा लढविताना १ कोटी ४७ लाख ९ हजार २७६ मते घेतली होती. भाजपच्या मतांची टक्केवारी २७.८१ टक्के इतकी सर्वाधिक राहिली. त्याखालोखाल शिवसेनेने २८२ जागा लढताना १ कोटी २ लाख ३५ हजार ९७० मते मिळविली होती. सेनेची मतांची टक्केवारी १९.३५ टक्के इतकी होती. कॉँग्रेसने २८७ जागांवर उमेदवार उभे केले होते. कॉँग्रेसने ९४ लाख ९६ हजार ९५ मते घेतली. त्यांच्या मतांची टक्केवारी १७.९५ इतकी होती, तर राष्टÑवादीने २७८ जागा लढताना ९१ लाख २२ हजार २८५ मते घेतली. राष्टÑवादीची मतांची टक्केवारी १७.२४ टक्के इतकी नोंदविली गेली होती. सेना-भाजपला एकूण २ कोटी ४९ लाख ४५ हजार २४६ मते मिळाली होती, तर कॉँग्रेस-राष्टÑवादीला १ कोटी ८६ लाख १८ हजार ५८० मते मिळाली होती.
मागील निवडणुकीत उधळलेला सेना-भाजपचा वारू रोखण्यासाठी यंदा कॉँग्रेस-राष्टÑवादीने चंग बांधला असला तरी गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांतून प्रमुख नेते-पदाधिकाऱ्यांची सुरू असलेली महागळती रोखण्यात त्यांना अपयश आले आहे. एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये युतीची चर्चा सुरू असतानाच कॉँग्रेस-राष्टÑवादीने मात्र आघाडी करीत प्रत्येकी १२५ जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे. उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत. आघाडीमुळे गेल्यावेळी मिळालेला जनाधार टिकवून ठेवण्याचे आव्हान समोर असतानाच मोठ्या प्रमाणावर झालेल्या आउटगोइंगमुळे मतांची गळती होणार नाही, याची काळजी आता आघाडीला वाहावी लागणार आहे.
>पवार कुणाकडे बघणार?
महागळतीमध्ये राष्टÑवादी सर्वाधिक डॅमेज झालेली आहे. त्यामुळे शरद पवारांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. अशातच शरद पवार यांनी सोलापूरमध्ये बोलताना मला आता काही लोकांकडे बघायचे आहे, असे सांगत पक्ष सोडणाऱ्यांना एकप्रकारे गर्भीत इशाराच दिला आहे. पवार यांच्या एकूणच राजकारणाची हातोटी पाहता पवार यांच्याकडून नेमके कुणाचे हिशेब चुकते होणार, याची उत्सुकता आता आख्ख्या महाराष्टÑाला लागली आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 - How to prevent the leakage of leaders' votes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.