सोलापूर : मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. आता घरी जाणार नाही. मी घरच्यांना सांगितलंय की तुमचं तुम्ही बघा; मला आता काही लोकांकडे बघायचं आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गयारामांना गर्भित इशारा दिला.विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी सकाळी सोलापुरात आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.पवार म्हणाले, माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापुरातून झाली. हा जिल्हा यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराने जाणारा आहे. स्वाभिमानाचा पुरस्कर्ता आहे. या जिल्ह्यात कुणीतरी लाचारीचा रस्ता स्वीकारला तर लोक त्याला दारात उभे करत नाहीत. त्यांना त्यांची जागा दाखवतात. तुम्ही फारशी चिंता करू नका. जे गेलेत त्यांची नावे काढू नका. जो मावळणार आहे त्याची चर्चा कशाला करायची? उद्याला जे उगवणार आहेत त्यांची चर्चा करा. अनेकांनी माझ्यासोबत अनेक वर्षे काढली. तुमच्या पाठिंब्यावर त्यांनी संस्था उभ्या केल्या. त्यांना आजच्या परिस्थितीत इथे राहणे अवघड झाले. ज्यांनी कष्ट घेतले त्यांनी या जिल्ह्याचा इतिहास बदलला. आज या इतिहासाचे मानकरी होण्याऐवजी दुसºयाच्या दारात सुभेदारी स्वीकारण्याची भूमिका काही लोकांनी स्वीकारली आहे, असा टोला पवारांनी मोहिते-पाटील यांचा नामोल्लेख न करता लगावला.मी तुरुंगात तर गेलोनाही, अमित शहांना टोलाशरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा प्रश्न भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी उपस्थित केला होता. त्यासंदर्भात पवार म्हणाले, शरद पवारांनी काय केलं हा भाग सोडून द्या. पण मी एवढंच सांगू इच्छितो, मी काही बरं-वाईट केलं म्हणून तुरुंगात गेलो नाही. जे तुरुंगात होते त्यांनी सांगायचे की तुम्ही काय केले. आम्ही काय केले हे लोकांना माहीत आहे. त्यांनी काय दिवे लावले हे लोकांना माहिती आहे, असा टोलाही पवारांनी अमित शहांना लगावला.मी काय म्हातारा झालो?८० वर्षांचा झालो म्हणजे मी काय म्हातारा झालो? अजून मला लय जणांना घरी पाठवायचं आहे. समोर बसलेल्या तरुणांच्या ताकतीच्या जोरावर मी हे करणार आहे, असा इशाराही खासदार शरद पवार यांनीया वेळी दिला.
Vidhan Sabha 2019 : मला आता काही लोकांकडे बघायचंय : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 4:12 AM