Vidhan Sabha 2019: मी मरेपर्यंत 'या' शहराला विसरु शकणार नाही, अजितदादांचे भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 12:17 PM2019-09-23T12:17:36+5:302019-09-23T12:18:05+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - रविवारी पिंपरीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेताना अजित पवार म्हणाले की, आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
पिंपरी - पिंपरी-चिंचवडमध्ये आमच्यासोबत जोवर कार्यकर्ते आहेत, तोवर कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही! मी मरेपर्यंत या शहराला विसरू शकणार नाही. मी खात्री देतो. यावेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्या. सहा महिन्यात शास्ती कर माफ केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही असं सांगत अजित पवारांनी लोकांना भावनिक आवाहन केलं आहे.
रविवारी पिंपरीमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेताना अजित पवार म्हणाले की, आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. वंचित बहुजनसोबत आघाडी करण्याची आमची इच्छा आहे. पुण्यात एकूण 8 विधानसभेच्या जागा आहे. त्यातील राष्ट्रवादी 4, काँग्रेस 3 आणि 1 जागा मित्रपक्षाला सोडली जाईल असं त्यांनी सांगितले. तसेच इच्छुकांची संख्या जास्त असल्याने मर्यादित लोकांनाच तिकीट देऊ शकतो असं अजित पवारांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवडमध्ये आमच्यासोबत जोवर कार्यकर्ते आहेत, तोवर कुणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही! मी मरेपर्यंत या शहराला विसरू शकणार नाही. मी खात्री देतो. यावेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून द्या. सहा महिन्यात शास्ती कर माफ केला नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही! pic.twitter.com/57aOVLbNQo
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) September 23, 2019
तसेच पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर तोंडसुख घेत अजित पवार म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून काही नेते भाजपात प्रवेश करत आहेत. त्यांनी केलेले घोटाळे बाहेर येऊ नये यासाठी सर्वांनी पक्षांतर केले असा आरोप अजितदादांनी केला. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही भावनिक ट्विट केलं होतं. थकलो आहे जरी, मी अजून झुकलो नाही, जिंकलो नसलो तरी अजून मी हरलो नाही. अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांना हाक दिली होती. पक्षांतरामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्ष सोडून भाजपा,शिवसेनेत प्रवेश करत आहे.
पिंपरी-चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसला बालेकिल्ला होता. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आणि महापालिकेवर सत्ता होती. मात्र कालांतराने भाजपाने अजित पवारांचा हा गड काबीज केला. लक्ष्मण जगताप, महेश लांडगे असे अनेक अजित पवारांचे विश्वासू सहकारी भाजपाच्या जवळ गेले. त्यामुळे अजित दादांची शहरावरची पकड ढिली झाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत हा गड पुन्हा कब्जा करण्यासाठी अजितदादांनी कंबर कसली आहे.