मुंबई : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असताना भाजपने पाच बुथचे मिळून बनलेल्या २० हजार शक्तिकेंद्रांचे मेळावे राज्यभर आयोजित करण्याचे ठरविले आहे. २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान हे मेळावे होतील, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांतील त्यांच्या सरकारच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून जनतेसमोर सादर केले. राज्याच्या इतिहासात पूर्वी कधीही असे घडलेले नव्हते. सुमारे चार हजार किलोमीटरची ही यात्रा म्हणजे संवादयात्राच होती. जनभावनाही मुख्यमंत्र्यांना जाणून घेता आल्या, असे पाटील म्हणाले. शेतकरी कर्जमाफी, मराठा समाजाला दिलेले आरक्षण, धनगर, ओबीसी समाजाला दिलेल्या सवलती, विविध योजनांच्या लाभार्र्थींच्या थेट बँक खात्यात लाभाची रक्कम देणे आदी निर्णयांमुळे सरकारबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूती असल्याचा दावा त्यांनी केला.पाच बूथमागे एक शक्तिकेंद्र अशी रचना प्रदेश भाजपने केली. त्यानसुार २० हजार शक्तिकेंद्रांची रचना केली असून एकेका शक्तीकेंद्राचे मेळावे आता आयोजित करण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली. भाजपच्या राज्य प्रभारी सरोज पांडे, महाजनादेश यात्रेचे मुख्य संयोजक आ. सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते.
Vidhan Sabha 2019: भाजपचे शक्तिकेंद्र मेळावे; मुख्यमंत्र्यांनी दिले रिपोर्ट कार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 2:17 AM