मुंबई - राज ठाकरेंच्यामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबतचा संभ्रम अखेर दूर झाला आहे. मनसे विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसे सुमारे 100 जागांवर निवडणूक लढवणार असून, त्यासाठी राज ठाकरे यांनी उमेदवारांची यादी मागवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर विधानसभेच्या मोजक्या जागा लढवण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे असे मनसेचे प्रभावक्षेत्र असलेल्या विभागातून मनसे 100 जागांवर उमेदवार देणार आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली आहे. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या भाषणाचा प्रभाव दिसून आला होता. मात्र लोकसभेच्या निकालांनंतर मनसेच्या गोटात तशी शांतताच होता. त्यातच मनसे यंदा विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे वृत्त पसरल्याने मनसैनिकांच्या गोटात निराशेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पक्षाने संपूर्ण राज्यात निवडणूक न लढवता प्रभावक्षेत्र असलेल्या भागात निवडणूक लढवावी, अशी मागणी मनसैनिक आणि नेत्यांकडून करण्यात येत होती. गेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारात राज ठाकरे यांचा बोलबाला राहिल्याचे दिसून आले होते. अर्थात त्यांच्या ‘मनसे’चे उमेदवार रिंगणात नव्हते, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या विरोधाची भूमिका असली तरी, कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मते द्या, असेही त्यांनी स्पष्ट सांगितलेले नव्हते; त्यामुळे प्रचारात गाजूनही मतांचा लाभ विरोधकांना होऊ शकला नव्हता. विधानसभा निवडणुकीत ‘मनसे’ फॅक्टर काही ठिकाणी महत्त्वाचा ठरण्याची अटकळ तेव्हापासूनच बांधण्यात येत आहे; पण काळ पुढे निघून चालला तरी त्याबाबतचा निर्णय या पक्षात होताना दिसत नाही. दोनच दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीतही ठोस निर्णय होऊ शकलेला नव्हता.
Vidhan Sabha 2019: मनसे 'सेन्चुरी'साठी तयार; राज ठाकरेंचं 'इंजिन' विधानसभा निवडणुकीत स्वबळावर धावणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 2:32 PM