मुंबई : सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्याने भाजप-शिवसेना युतीची बोलणी रखडली असल्याची चर्चा असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानाचे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.माथाडी कामगारांचे नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबईत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर नरेंद्र पाटील यांच्या घरी भोजन ठेवले होते. जेवणापूर्वी हात धुवत असताना मुख्यमंत्र्यांनी उद्धव यांना सहज विचारले, ‘पितृ पक्षाची काही अडचण नाही ना?’ त्यावर ‘अहो, आमचा पक्षच ‘पितृ’पक्ष आहे!’ असे मार्मिक उत्तर उद्धव यांनी दिले. उद्धव यांच्या हजरजवाबी उत्तराने हशां पिकला नसता तरच नवल.उद्धव यांनी दिलेले उत्तर मार्मिक तितकेच खोचक होते. एक तर शिवसेना हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष असल्याने खऱ्या अर्थाने तो उद्धव यांच्यासाठी ‘पितृ’पक्षच आहे. तर दुसरीकडे युतीत आमचाच पक्ष थोरला असल्याचे उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना सांगून टाकले!
Vidhan Sabha 2019: पितृपक्षाची अडचण तर नाही ना?; मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नाला उद्धव ठाकरेंचं भन्नाट उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 2:33 AM