अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल पार्थ पवारही अनभिज्ञ?; फोन उचलला, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 08:46 PM2019-09-27T20:46:29+5:302019-09-27T20:48:31+5:30
अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल कुणालाही काहीही माहीत नाही, असं चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते, पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या राजीनाम्याबद्दल कुणालाही काहीही माहीत नाही, असं चित्र आहे. अजित पवारांचा फोन 'नॉट रिचेबल' आहेच, पण त्यांनी त्यांच्या पीएंचे फोनही काढून घेतल्याचं समजतंय. अशावेळी, पार्थ पवार यांनी पत्रकारांचा फोन उचलला खरा, पण तेही राजीनाम्याबाबत अनभिज्ञ असल्याचं जाणवलं किंवा तसं भासवण्यात तरी आलं.
अजित पवारांच्या राजीनाम्याबाबत विचारलं असता, 'माहिती घेऊन सांगतो' एवढंच मोघम उत्तर पार्थ पवार यांनी दिलं. आता खरंच त्यांना वडिलांच्या राजीनाम्याच्या निर्णयाबद्दल माहिती नव्हती की त्यांनी मुद्दामच बोलणं टाळलं, हे आत्तातरी समजायला मार्ग नाही. परंतु, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना किंचितही मागमूस लागू न देता अजित पवारांनी राजीनामा दिल्याचं नक्की आहे. इतकंच नव्हे तर, खुद्द शरद पवार यांनाही या राजीनाम्याबद्दल कल्पना नसावी, असंच चित्र दिसतंय. कारण, त्यांना जर या गोष्टीची थोडी जरी कुणकुण लागली असती, तर ते दुपारी मुंबईहून पुण्याला गेले असते का, असा प्रश्न उपस्थित होतो.
का, कधी, कसं, कुठे?... कुछ तो गडबड है... #AjitPawar#SharadPawar@NCPspeaks@AjitPawarSpeakshttps://t.co/8CUXGZxYfu
— Lokmat (@MiLOKMAT) September 27, 2019
शरद पवार आज दुपारी ईडी कार्यालयात जाणार होते. त्यामुळे सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांची रीघ सिल्वर ओक बंगल्यावर लागली होती. त्यात अजित पवार कुठेच नव्हते. हा प्रश्न माध्यमांनी नेतेमंडळींना विचारला. त्यावर, अजितदादा त्यांच्या मतदारसंघात पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सहभागी झाल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. स्वतः शरद पवार यांनी आपल्यासमोरच त्यांना तसा सल्ला दिल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं होतं. परंतु, हे दावे कितपत खरे होते, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. कारण, आज सकाळपासून अजित पवार मुंबईतच होते आणि संध्याकाळी त्यांनी राजीनामा दिल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं.
दरम्यान, 'दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी आपल्याला फोन केला होता. कुठे आहात असं विचारलं होतं. मी त्यावेळी औरंगाबादला होतो. त्यानंतर, आज संध्याकाळी ५.४० वाजता त्यांनी विधानभवनातील माझ्या दालनात सागर नावाच्या 'पीएस'कडे स्वतःच्या हस्ताक्षरातील राजीनामा सोपवला. मी फोनवर त्यांना कारण विचारलं असता, आत्ता काही सांगत नाही, फक्त राजीनामा मंजूर करा, एवढंच ते म्हणाले' अशी माहिती विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली आहे. अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांनी राजीनामा दिला अन् केलं आभाराचं ट्विट! https://t.co/WPEPLGwsw5
— Lokmat (@MiLOKMAT) September 27, 2019