मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठीचाभाजपा आणि शिवसेनेमधील जागावाटपाचा गुंता दिवसेंदिवस जटील होत चालला आहे. त्यातच जागावाटपामध्ये नमते घेण्यास शिवसेनेने नकार दिल्याने युतीची घोषणा लांबली आहे. दरम्यान, दिलेल्या शब्दावर ठाम राहता येत नसेल तर भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज आहे. असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला आहे. जागावाटपाबाबत दिवसेंदिवस लंबत चाललेले चर्चेचे गुऱ्हाळ आणि 2014 प्रमाणेच यावेळीही जागावाटपाचे एकापाठोपाठ एक फॉर्म्युले समोर येत असल्याने शेवटच्या क्षणी युती तुटणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपाला चार शब्द सुनावले. ''विधानसभेच्या जागावाटपाबाबत लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांनी एक फॉर्म्युला ठरवला होता. समसमान जागावाटपाचे सूत्र तेव्हा ठरले होते. त्या फॉर्म्युल्यावर आम्ही ठाम आहोत. आता भाजपाला जर आपल्या दिलेल्या शब्दावर ठाम राहता येत नसेल तर भाजपाला आत्मपरीक्षणाची गरज आहे,'' असा टोला राऊत यांनी लगावला. ''हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. येथे दिलेल्या शब्दाला किंमत आहे. युतीमध्ये आम्ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणींचा काळ पाहिलाय. प्रमोद महाजन यांनाही पाहिलंय. हे तिन्ही नेते शब्दाला पक्के होते.'' असे सांगत संजय राऊत यांनी भाजपाच्या सध्याच्या नेतृत्वावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.
दरम्यान, भाजपासोबत सत्तेत जाऊन आम्ही चूक केल्याचं विधान संजय राऊत यांनी काल केले होते. '2014 साली शिवसेनेतील काही नेत्यांना वाटत होते आपण सत्तेत गेलो पाहिजे पण माझं यावर मत वेगळं होतं. आम्ही सत्तेत गेलो नसतो तर चित्र वेगळं असतं', मागील 5 वर्ष राज्यात शिवसेना-भाजपाची सत्ता होती. सुरुवातीच्या काळात विरोधी पक्षात बसलेली शिवसेना अवघ्या 3 महिन्यात सत्ताधारी बाकांवर जाऊन बसल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्यासह संपूर्ण पक्ष सत्ताधारी पक्षात गेला. शिवसेनेच्या या निर्णयावर अनेकांनी टीकाही केली होती.