मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपाचे अवघड गणित सुटले असून या प्रमुख पक्षांनी बहुतांश उमेदवार जाहीर केले आहेत. जागा वाटपात मतदारसंघ दुसऱ्या पक्षाला गेल्यामुळे, तर कुठे तिकीट कापले गेल्याने इच्छुकांची घोर निराशा झाली आहे. नाराजांनी बंडखोरीची भाषा केल्याने त्यांना मनवण्याचे प्रयत्न सुरू असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतरच किती बंडोबा मैदानात असतील, हे चित्र स्पष्ट होईल.यवतमाळात शिवसैनिक नाराजयवतमाळ जिल्ह्यात भाजपाऐवढीच ताकद जिल्ह्यात असताना शिवसेनेला केवळ एकच मतदारसंघ का? म्हणून शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळते. शिवसेनेने सात पैकी दिग्रस, पुसद वगळता वणी व उमरखेड मतदारसंघावर दावा सांगितला होता. पुसद भाजपला देऊन उमरखेड सेनेकडे घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु भाजपने केवळ एकाच मतदारसंघावर बोळवण केल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच वणीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, उपजिल्हा प्रमुख सुनील कातकडे, आशिष खुलसंगे, उमरखेडमध्ये डॉ. विश्वनाथ विणकरे, यवतमाळात संतोष ढवळे, नगरसेवक गजानन इंगोले यांनी बंडखोरीची तयारी चालविली आहे. हा मतदारसंघ काँग्रेसकडेच कायम राहिला. त्यामुळे राष्टÑवादीचे इच्छुक डॉ. लोढा यांनी आता बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे. भाजपने आर्णीचे वादग्रस्त आमदार प्रा. राजू तोडसाम यांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे तोडसाम अपक्ष रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जाते.गोंदियात भाजपमध्ये बंडखोरीगोंदिया विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी दोन दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना या मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी दिली जाणार असून ते शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र यामुळे भाजपमधील अनेक निष्ठावान कार्यकर्ते दुखावले आहे. तर मागील दहा वर्षांपासून या मतदारसंघातून तयारी करित असलेले भाजपचे माजी जिल्ह्याध्यक्ष विनोद अग्रवाल यांना उमेदवारी देतांना डावल्याने त्यांनी भाजपमधून बंडखोरी करत गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.बीड जिल्ह्यात बंडखोरीची शक्यताबीड जिल्ह्यात माजलगाव आणि गेवराई मतदारसंघात बंडखोरीची शक्यता आहे. गेवराईची जागा भाजपाला सुटल्यामुळे शिवसेनेचे इच्छूक माजी राज्यमंत्री बदामराव पंडित तर माजलगावमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार आर.टी. देशमुख यांचे तिकीट कापून रमेश आडसकर यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. भाजपाचे नाराज मोहन जगताप हे बंडखोरी करत अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. गेवराईत भाजपाचे आ. लक्ष्मण पवार विद्यमान आमदार असल्यामुळे ही जागा भाजपाला सुटली. त्यामुळे नाराज बदामराव पंडित यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे. माजलगावमध्ये भाजपाचे आर.टी. देशमुख यांचेही तिकीट कापल्याने तेही बंडखोरीच्या पवित्र्यात आहेत.कुंभारेंच्या विरोधात दटके समर्थकांची निदर्शनेनागपूर : विधानसभेचे तिकीट नाकारल्यामुळे दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे व मध्य नागपुरातून संधी हुकलेले भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्या समर्थकांनी बुधवारी बंडाचे निशाण फडकविले. कोहळे समर्थकांनी रस्ता रोको केला. पक्षश्रेष्ठींच्या विरोधात बॅनर झळकविले.तर दटके समर्थकांनी कुंभारे यांच्या विरोधात बडकस चौकात निदर्शने केली. विशेष म्हणजे शिस्तबद्धतेला महत्व असलेल्या या पक्षात दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी ज्येष्ठ नेत्यांच्या नावे शिवीगाळही केली. मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना जातीच्या आधारावर उमेदवारी दिल्याचा आरोप करीत नारे-निदर्शने केली.पश्चिम व-हाडात नाराजीचे वारेअकोला : विधानसभा निवडणुकीसाठी युती व आघाडीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर पश्चिम वºहाडातील १५ मतदारसंघांमध्ये नाराजीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. अकोल्यात बाळापूर मतदारसंघात शिवसेनेला उमेदवारी मिळाल्यामुळे शिवसंग्रामकडून गत निवडणुकीप्रमाणेच पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकण्याची चिन्हे आहेत.शिवसंग्रामचे संदीप पाटील हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. याच मतदारसंघात ‘वंचित’ने उमेदवारी नाकारलेल्या विद्यमान आमदार बळीराम सिरस्कार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा अर्ज कायम राहिल्यास ‘वंचित’मधील मोठे बंड ठरेल.मुंबईत नाराजीची फक्त भाषाशिवसेना-भाजप यांच्या उमेदवारी याद्या जाहीर झाल्या नंतर नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. अद्याप कोणी थेट उमेदवारी अर्ज दाखल करून बंडाचे निशाण फडकावलेले नाही. वडाळ््याची जागा भाजपकडे गेल्याने शिवसेनेच्या श्रद्धा जाधव नाराज होत्या. त्यांनी मातोश्रीवर जाऊन त्यांची नाराजीही व्यक्त केली. पण त्या बंडखोरी करण्याची शक्यता धूसर आहे.मुंबईत भाजपचे प्रकाश मेहता, राज पुरोहित, विनोद तावडे यांना अजूनही उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहेत. सायन-कोळीवाड्यातून शिवसेनेचे मंगेश सातमकर आणि मुलुंडमधून भाजपचे प्रकाश गंगाधरे इच्छूक होते. मात्र त्यांना उमेदवारी मिळवण्यात अपयश आले.चिखलीकरांची भूमिका आज ठरणारनांदेड : लोहा मतदारसंघ शिवसेनेने स्वत:कडे कायम ठेवल्याने भाजपचे खा़ प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कार्यकर्त्यांत असंतोष आहे़ तर माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर हेही नायगाव मतदारसंघात डावलल्याने दुखावले गेले आहेत़ या दोघांची भूमिका गुरुवारी ठरणार आहे़ शिवसेनेच्या गडावरही बंडखोरीचा झेंडा फडकला आहे़ हदगावमध्ये माजी जिल्हाप्रमुख बाबूराव कदम हे पक्षादेश डावलून अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत़ नायगाव मतदारसंघात भाजपकडून राजेश पवार यांना उमेदवारी मिळाल्याने भास्करराव पाटील खतगावकर नाराज झाले आहेत़ उमेदवारीसाठी खतगावकर यांच्या स्रुषा मीनल पाटील प्रयत्नशील होत्या़ मीनल पाटील अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता.राजी-नाराजीचे नाट्य रंगलेनाशिक पश्चिम मतदारसंघात भाजपच्या आमदार सीमा हिरे यांनाच उमेदवारी दिल्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक विलास शिंदे यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. शिवसेनेचे दुसरे नगरसेवक दिलीप दातीर यांनी मनसेची उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. तर भाजपचेच नगरसेवक दिनकर पाटील यांनीदेखील समर्थकांचा मेळावा घेऊन अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.दुसरीकडे देवळाली मतदारसंघ सेनेला सोडल्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या नगरसेवक सरोज अहिरे यांनीही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, इगतपुरी मतदारसंघातून कॉँग्रेसमधून सेनेत प्रवेश केलेल्या निर्मला गावित यांना उमेदवारी दिल्याने माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी समर्थकांची जमवाजमव सुरू केली आहे. नांदगाव मतदारसंघ सेनेला सुटल्यामुळे भाजपच्या मनीषा पवार यांनी बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे.
Vidhan sabha 2019 : तिकीट कापले, स्वप्न भंगले; सर्वच पक्षात बंडखोरीचे वारे वाहू लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 5:27 AM