- कमलेश वानखेडे नागपूर : राज्यभरातील काँग्रेस- राष्ट्रवादीचे नेते आपल्या गळाला लावणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात घेरण्यासाठी काँग्रेस - राष्ट्रवादीकडून काहीच हालचाली होताना दिसत नाही. गेल्यावेळी लढलेले उमेदवार यावेळी लढायला इच्छुक नाही. बाहेरचा उमेदवार लादला जाऊ नये, अशी भूमिका स्थानिक कार्यकर्त्यांनी घेतली आहे. अशात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात लढणार तरी कोण, असा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.२०१४ मध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी १,१३,९१८ मते घेत काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचा ५८,९४२ मतांनी पराभव केला होता. गुडधे यावेळी येथून लढण्यास इच्छुक नाहीत. त्यांनी पश्चिम नागपूरसाठी अर्ज केला आहे. बहुजन विचार मंचचे संयोजक नरेंद्र जिचकार, जय जवान जय किसान संघटनेने संयोजक प्रशांत पवार यांच्याही नावाची प्रदेश काँग्रेसकडे चर्चा आहे. पण जिचकार यांनीही पश्चिम नागपूरसाठी दावा केला आहे.नागपूर लोकसभा लढलेले माजी खासदार व काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख नाना पटोले व भाजप सोडून काँग्रेसवासी झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांच्याही नावाची चर्चा आहे. मात्र, हे दोन्ही नेते दुसऱ्याच मतदारसंघांसाठी इच्छुक आहेत. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचे समर्थक असलेल्या माजी नगरसेविका रेखा बाराहाते, शहर काँग्रेसचे सचिव किशोर उमाठे यांनी अर्ज केले आहेत. या दोन्ही इच्छुकांनी स्थानिक कार्यकर्त्यालाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षाकडे केली आहे.पक्षाने बाहेरचा उमेदवार येथे ‘लॅण्ड’ करू नये, तसे झाले तर स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे ऐनवेळी श्रेष्ठींनी वरून उमेदवार दिला तर त्याला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याचा धोका आहे. शहर अध्यक्ष विकास ठाकरे पश्चिम नागपूरच्या तयारीत व्यस्त आहेत.पक्षाने दोन वर्षांपूर्वी सांगितले असते तर विचार केला असता, अशी भूमिका ठाकरे यांनी घेतली आहे. नागपुरात काँग्रेसमध्ये गटबाजी जोरात आहे. दक्षिण-पश्चिममध्येही ती लपून राहिलेली नाही. त्यामुळे सर्व गटांना चालेल अशा नावाच्या शोधात काँग्रेस आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून मिळालेली प्रसिद्धी आणि त्यांची वाढलेली ताकद पाहता त्यांच्यासमोर लढण्याचे धाडस करण्यास कोणीही तयार नसल्याचेच चित्र आहे.मतदारसंघाकडे बारकाईने लक्षमुख्यमंत्री राज्यभरातील कामात व्यस्त असतानाही लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ५५,११६ मतांची आघाडी मिळाली.मुख्यमंत्र्यांचे पाच वर्षे मतदारसंघाच्या विकासाकडे बारकाईने लक्ष होते. ते न चुकता मतदारसंघातील विकास कामांचा आढावा घेत होते.
Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 2:30 AM