Vidhan Sabha 2019: ...तर भाजपच्या ६ आमदारांवर घरी बसण्याची वेळ येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 02:27 AM2019-09-27T02:27:31+5:302019-09-27T06:44:20+5:30
चार आमदार तिशीतील; सर्वपक्षीयातील १३ आमदार सत्तरी पार
- धनंजय वाखारे
नाशिक : लोकसभा निवडणुकीत सत्तरी पार केलेल्या ज्येष्ठांना सक्तीची विश्रांती देणाऱ्या भाजपकडून महाराष्टÑ विधानसभा निवडणुकीतही तोच कित्ता गिरविला जाणार असेल तर ६ विद्यमान आमदारांना घरी बसण्याची वेळ येणार आहे. धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांनी लोकसभा निवडणुकीच्यावेळीच बंड पुकारत राजीनामा दिलेला आहे.
२०१४ मध्ये निवडून आलेल्या सर्वपक्षीय १३ आमदारांनी आता सत्तरी पार केलेली आहे, तर ३५ आमदार साठीच्या वर आहेत. सांगोल्याचे सर्वात ज्येष्ठ आमदार ९२ वर्षीय गणपतराव देशमुख आणि चंदगडच्या संध्यादेवी कुपेकर यांनी स्वत:च निवडणूक रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
१०१ आमदार हे ५० ते ६० या वयोगटातील तर ९६ आमदार हे ४० ते ५० या वयोगटातील आहेत. ३५ आमदार हे ६० ते ७० या वयोगटातील आहेत. २० ते ३० या वयोगटातील अवघे चार तरुण आमदार निवडून आले होते. ३० ते ४० या वयोगटातील आमदारांची संख्या ४७ इतकी होती. मावळत्या विधानसभेतील १३ आमदारांनी आता वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यात भाजपचे ७, राष्ट्रवादीचे ३, कॉँग्रेसचे २ आणि शेकापच्या एका आमदाराचा समावेश आहे. विरोधी पक्षांमधील विधानसभेत सर्वाधिक वयोवृद्ध सदस्य असलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे गणपतराव देशमुख यांनी आता नव्वदी पार केलेली आहे. तब्बल ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम करणाऱ्या देशमुख यांनी आता स्वत:हून थांबण्याचा निर्णय घेतला आहे तर राष्ट्रवादीच्या चंदगडमधील आमदार संध्यादेवी कुपेकर यांनीही निवडणूक रिंगणात न उतरण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मधुकरराव चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी पुन्हा निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी चालविली आहे.
सत्तरी पार केलेले आमदार
नाव मतदारसंघ पक्ष वय
उदेसिंग पाडवी शहादा भाजप ७१
नाना श्यामकुळे चंद्रपूर भाजप ७०
मनोहर नाईक पुसद राष्ट्रवादी ७७
हरिभाऊ बागडे फुलंब्री भाजप ७४
छगन भुजबळ येवला राष्ट्रवादी ७२
सरदार तारासिंग मुलुंड भाजप ८२
मधुकर चव्हाण तुळजापूर कॉँग्रेस ८२
गणपतराव देशमुख सांगोला शेकाप ९२
पृथ्वीराज चव्हाण कराड कॉँग्रेस ७३
संध्यादेवी कुपेकर चंदगड राष्ट्रवादी ७०
शिवाजीराव नाईक शिराळा भाजप ७४
विलासराव जगताप जत भाजप ७१