बसपा, वंचित वाढविणार काँग्रेसचं 'बीपी'; भाजपा साधेल का हॅटट्रिकची संधी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 07:59 PM2019-09-21T19:59:00+5:302019-09-21T20:00:47+5:30

एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदार संघात भाजपने संघटनेच्या बळावर गत दशकभरात पकड मिळविली.

Maharashtra Vidhan Sabha 2019: Will BJP win in Umred Constituency | बसपा, वंचित वाढविणार काँग्रेसचं 'बीपी'; भाजपा साधेल का हॅटट्रिकची संधी?

बसपा, वंचित वाढविणार काँग्रेसचं 'बीपी'; भाजपा साधेल का हॅटट्रिकची संधी?

Next
ठळक मुद्देउमेरडचे मैदान मारताना काँग्रेसचं बीपी वाढणार आहे.  आता सलग दोन टर्म आमदार असलेले सुधीर पारवे तिसऱ्यांदा भविष्य अजमाविण्याच्या तयारीत आहे.

>> जितेंद्र ढवळे

२०१४ मध्ये चौरंगी लढतीत काँग्रेसला चारही खाणे चित करणाऱ्या उमरेड विधानसभा मतदार संघात यावेळी भाजप विजयाची हॅटट्रिक करणार का, यावर राजकीय पोलपंडिताकडून तर्कवितर्क लावले जात आहेत. इकडे काँग्रेसची यंग ब्रिगेड भाजपच्या विजयरथाला ब्रेक लावण्यासाठी सज्ज झाली आहे. मात्र बसपाची गतवेळची कामगिरी, वंचित बहुजन आघाडीचे नवे आव्हान विचारात घेत उमेरडचे मैदान मारताना काँग्रेसचं बीपी वाढणार आहे.  

माजी मंत्री डॉ. श्रावण पराते यांनी १९८५, १९९० आणि १९९५ अशा सलग तीन विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केला आहे. उमरेडमध्ये हॅटट्रिक साधणारे ते एकमेव आमदार आहेत. त्यांनी चवथ्यांदाही निवडणूक लढविली होती. परंतु त्यावेळी अपक्ष उमेदवार वसंत इटकेलवार यांनी त्यांचा पराभव केला. आता सलग दोन टर्म आमदार असलेले सुधीर पारवे तिसऱ्यांदा भविष्य अजमाविण्याच्या तयारीत आहे. यामुळे ते विजयाची हॅटट्रिक करून पराते यांच्या रेकॉर्डची बरोबरी साधतील का, याकडेही  मतदारांचे लक्ष लागले आहे.

एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणाऱ्या या मतदार संघात भाजपने संघटनेच्या बळावर गत दशकभरात पकड मिळविली. यापूर्वी माजी राज्यमंत्री तथा नागपूर जिल्हा ग्रामीण कॉँग्रेस कमिटीचे  जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी या क्षेत्रात विकासकामांनी मतदारांना प्रभावित केले. २००४ मध्ये मुळक जिंकले. अशातच २००९ मध्ये हा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला.

२००९ मध्ये जिल्हा परिषद सदस्य सुधीर पारवे यांना भाजपाने संधी दिली. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे पानीपत करीत शिरीष मेश्राम यांचा ४४,६९६ मतांनी पराभव केला. २०१४ मध्ये मोदी लाटेत पारवे यांच्या मताधिक्यात पुन्हा वाढ झाली. पारवे यांनी ९२,३९९ मते घेत बसपाच्या वृक्षदास बन्सोड यांना ५८,३२२ मतांनी पराभूत केले. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजू पारवे यांनी २३,४९७ मते मिळविली होती. चौरंगी लढतीत येथे काँग्रेसचे संजय मेश्राम चौथ्या क्रमांकावर गेले.

यावेळी येथे काँग्रेसकडून संजय मेश्राम आणि राजू पारवे प्रबळ दावेदार आहेत.  बसपाकडून येथे वृक्षदास बन्सोड आणि संदीप मेश्राम दावेदार आहेत. दलित आणि बहुजन मतदारावर भिस्त असलेल्या या मतदार संघात वंचित बहुजन आघाडीनेही लक्ष केंद्रीत केले आहे. वंचितकडून राजू मेश्राम उमरेडची खिंड लढविण्याच्या तयारीत आहेत.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019: Will BJP win in Umred Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.