Vidhan Sabha 2019: ठाकरे कुटुंबातील युवराज निवडणुकीच्या आखाड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 03:46 AM2019-09-24T03:46:13+5:302019-09-24T03:48:46+5:30
वरळी शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने तेथे निवडून येण्यात आदित्य यांना कोणतीही अडचण जाणार नाही.
- यदु जोशी
आदित्य ठाकरे हे शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र, युवासेनेचे प्रमुख आहेत आणि आता ते निवडणूक लढविणारे पहिले ठाकरे म्हणून इतिहास रचणार आहेत. निवडणुकीच्या राजकारणातील त्यांचे हे पहिले पाऊल असेल. राजकारणात ते युवासेनेच्या माध्यमातून दहा वर्षांपूर्वीच आले. दक्षिण मुंबईतील वरळीमधून ते लढतील हे जवळपास नक्की आहे. ‘वरळीचा असा काही विकास करू की तो बघायला जगातील नेते येतील’, असं त्यांनी शिवसैनिकांच्या वरळीतील मेळाव्यात सांगितलं आणि ते तेथूनच लढणार हा समज अधिक पक्का झाला. ते वरळीतूनच का लढू इच्छितात? याची काही कारणं आहेत. एकतर या मतदारसंघात करून दाखविण्यासारखं खूप काही आहे. वरळी सीफेस आहे. जिथे ते पर्यटकांना आकर्षित करण्याजोगं काही करू शकतात. महालक्ष्मी रेसकोर्स आहे. त्या ठिकाणी न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या धर्तीवर एक थीम पार्क उभारण्याचं शिवसेनेचं स्वप्न आहे, त्यात स्वत: आदित्य यांना विशेष रस आहे. रेसकोर्सच्या जागेची तीन चतुर्थांश मालकी राज्य शासनाची तर एक चतुर्थांश मालकी महापालिकेची आहे. सरकारमध्ये राहून थीम पार्क साकारणे अधिक सोपे जाईल, असं त्यांना वाटतं.
वरळी हा एक कॉस्मोपॉलिटन मतदारसंघ आहे आणि तो आदित्य यांच्या व्यक्तिमत्वास मॅच करणारा आहे. मुंबईत नाईट लाईफ सुरू व्हावं, असं त्यांना वाटतं. रात्री उशिरापर्यंत मॉड तरुणाईनं गजबजणारे फिनिक्स मॉल, टोडी मिल, कमला मिल कम्पाऊंड हे वरळी मतदारसंघात येतात. त्यापैकी एका ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ते नाईट लाईफ सुरू करू शकतील. बीडीडी चाळीसारखा महत्त्वाकांक्षी पुनर्विकास प्रकल्प याच मतदारसंघात आहे. वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तेथे निवडून येण्यात आदित्य यांना कोणतीही अडचण जाणार नाही.
आदित्य हे नव्या पिढीचे नेते आहेत. त्यांचा नागरी समस्यांचा अभ्यास असून त्या सोडविण्यासाठीचं व्हिजनही आहे. तुम्ही त्यांच्याशी वन टू वन बोलाल तर ते तुम्हाला नक्कीच प्रभावित करतील. परंपरागत शिवसैनिकासारखे ते नक्कीच नाहीत. ‘उद्धवजींचं लाडकं बाळ’ वा पप्पू वगैरे तर नाहीतच; हे तुम्हाला त्यांच्याशी बोलताना पहिल्या दहा-वीस मिनिटांतच कळेल. ‘आज तक’च्या अंजना कश्यप त्यांना कधी भेटलेल्या नसाव्यात नाही तर त्यांचं तसं ‘इम्प्रेशन’ नक्कीच झालं नसतं. आदित्य यांच्या हट्टापायी राणीच्या बागेत पेंग्विन आणले म्हणून त्यांची सोशल मीडियात थट्टा केली गेली. त्यांच्या संकल्पनेतही पैसे खाणारे त्यांच्याच पक्षांचे लोक असल्यानं पेंग्विनच्या देखभालीचं कंत्राट वादग्रस्त ठरलं, पण आज केवळ पेंग्विनमुळे हजारो लोक राणीच्या बागेत येताहेत. वीकएंडला तर तीस-तीस हजार लोक भेट देतात. महापालिकेचं उत्पन्न तर वाढलंच शिवाय एक नवं आकर्षण केंद्र तयार झालं.
शिवसेना आज सरकारमध्ये आहे पण आयएएसपासूनच्या नोकरशहांमध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीला मानणारे अधिकारी आहेत. शिवसेनेशी बांधिलकी असलेले अधिकारी नसल्यानं शिवसेनेच्या संकल्पना सरकारच्या माध्यमातून राबविण्यात अडचणी येतात. विधिमंडळात गेल्यास शिवसेनेला मानणारी नोकरशाहीतील माणसं जोडता येतील, असंही आदित्य यांना वाटतं. त्यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी खूप चर्चेत आहे पण त्यांना जवळून ओळखणारे सांगतात की ते लगेच कुठलेही मंत्रीपद घेणार नाहीत. वर्ष दोन वर्षे प्रशासनाचा अभ्यास करून मग पद घेतील. इशारा एवढाच की आदित्य यांच्याभोवती एक ‘कोटरी’ जमू पाहत आहे ती त्यांनी आताच तोडलेली बरी!