Maharashtra Vidhan Sabha 2024 ( Marathi News ) : गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरुच आहे. महाविकास आघाडीमध्ये ९०,९०,९० चा फॉर्म्युला ठरल्याचे जाहीर झाला. पण अजूनही महाविकास आघाडीच्या जागावाटपात घोळ असल्याचे समोर आले आहे.आज काँग्रेसने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत सोलापूरात दक्षिणमधून दिलीप माने यांना उमेदवारी जाहीर केली तर याच मतदारसंघात या आधीच ठाकरे गटानेही उमेदवार दिला आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने याआधीच अमर पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. पाटील उद्या अर्ज दाखल करणार होते, त्याआधीच काँग्रेसने तिथे उमेदवार दिला आहे. यामुळे आता या मतदारसंघात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण या चर्चा सुरू आहेत. यामुळे आता महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ असल्याचे समोर आले आहे.
आता या मतदारसंघात महाविकास आघाडीमधील कोणता पक्ष उमेदवारी मागे घेणार की मैत्रिपूर्ण लढत होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महाविकास आघाडीमध्ये ९०-९०-९० जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली होती. पण काँग्रेसने आता पर्यंत उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत ९९ उमेदवारांची घोषणा झाली आहे.
तर दुसरीकडे, पंढरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भालके यांच्या उमेदवारी संदर्भात गेल्या काही दिवसापासून चर्चा सुरू होत्या. आता अखेर भालके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.