Maha Vikas Aghadi Maharashtra Election 2024: 'सांगोला आम्ही लढणार. आमचे दीपक आबा साळुंखे साधारण ४० ते ५० हजारांच्या मताधिक्याने तिथे जिंकून येत आहेत. हे तुम्हाला आता सांगू शकतो', असे सांगत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यास नकार दिला आहे. (Maha Vikas Aghadi Seat Sharing Latest News)
महाविकास आघाडीचे जागावाटप झाले असले, तरी काही मतदारसंघात दोन-दोन पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सांगोला विधानसभा मतदारसंघातही हाच पेच असून, इथे कोण माघार घेणार याकडे लक्ष आहे. पण, ठाकरेंच्या शिवसेनेने माघार घेण्यास नकार दिला आहे.
मविआ कोणत्या उमेदवारांना माघार घ्यायला लावणार?
खासदार संजय राऊत म्हणाले की, "उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे, तोपर्यंत आम्ही जिथे जिथे एकमेकांचे उमेदवार उभे आहेत, त्यांना अर्ज मागे घ्यायला लावू. ज्या जागांचे वाटप अधिकृत झाले आहे, त्या अधिकृत, अशा पद्धतीने हे ठरवणार आहोत."
ठाकरे शेकापला कोणत्या जागा देण्यास तयार?
"आम्ही ९६ जागा आहेत. यात शेतकरी कामगार पक्ष आमच्या वाट्याला आला, तर एक-दोन जागा आम्हाला त्यांना द्याव्या लागेल. अलिबागच्या जागेबद्दल चर्चा करू. पेणची जागा आहे. बाकी मला वाटतं नाही फार चर्चा होईल. सांगोला आम्ही लढणार आहोत. दीपक आबा साळुंके जिंकून येत आहे, हे मी आताच सांगतोय", असे खासदार संजय राऊत म्हणाले.