मुंबई - गेल्या महिनाभरापासून राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे वाहत होते. आज मतदानाचा दिवस असून सकाळपासून मतदारांची गर्दी अनेक केंद्राबाहेर पाहायला मिळत आहे. यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी आहे. त्यातच महाविकास आघाडीतउद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना काँग्रेसच्या भूमिकेमुळे फटका बसताना दिसत आहे. सोलापूर, रामटेक मतदारसंघात ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराऐवजी काँग्रेसकडून अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी काँग्रेसनं घेतलेल्या यू टर्नमुळे ठाकरेंना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.
रामटेक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी विशाल बरबटे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र या मतदारसंघात इच्छुक काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी करून अपक्ष अर्ज भरला. विशेष म्हणजे मुळक यांच्या प्रचारासाठी स्थानिक काँग्रेस खासदार, नेत्यांपासून सगळेच प्रचारात दिसून आले. मतदानाच्या आदल्यादिवशी माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांनी मतदारांना आवाहन करत अपक्ष उमेदवार राजेंद्र मुळक यांना मत देण्याचं आवाहन केले आहे. त्यामुळे या मतदारसंघात महाविकास आघाडीतील बिघाडी समोर आली आहे.
केवळ रामटेकमध्ये नाही तर सोलापूर दक्षिण मतदारसंघातही ऐनवेळी ठाकरेंना धक्का देण्यात आला आहे. खासदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडून अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना थेट पाठिंबा जाहीर करत विजयी करण्याचं आवाहन केले आहे. शिंदे यांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीत कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं सांगितले जात होते. मात्र मतदानाच्या दिवशीच मविआतील कुरघोडी उघडपणे दिसून आली आहे.
काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे?
गेल्या अनेक वर्षापासून मी या मतदान केंद्रावर मतदान करतो. आता या मतदारसंघात धर्मराज काडादी उमेदवार आहेत. या मतदारसंघात चांगले वातावरण आहे. काडादी एक चांगले उमेदवार आहेत, त्यांना भविष्य आहे. या मतदारसंघात माने यांना उमेदवारी मिळाली होती पण त्यांना फॉर्म मिळालेला नाही त्यामुळे माने यांनीही काडादी यांना पाठिंबा दिला आहे. या मतदारसंघात शिवसेनेने जास्त गडबड केली. आम्ही या ठिकाणावरुन दोनवेळा निवडून आलो होतो. आम्ही आता त्यांना हे सगळं समजून सांगितले आहे. यामुळे आता काँग्रेसचा अधिकृत पाठिंबा धर्मराज काडादी यांनी असल्याचे सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेस अनेक ठिकाणी उद्धव ठाकरेंना धक्का देतेय, धक्का देण्याचे त्यांचे नियोजन आहे. आता हा धक्का उघड झालाय म्हणून सोलापुरला अपक्ष उमेदवाराला प्रणिती शिंदे यांनी पाठिंबा दिलेला आहे आणि उद्धव ठाकरेंना जोरात धक्का दिला आहे. याचे पडसाद महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसताहेत. उद्धव ठाकरे हे सहन करु शकत नाही. उबाठाचेही महाराष्ट्रातील कार्यकर्ते आज काँग्रेसला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज झालेत. तेही काँग्रेसला मतदान करतील असे वाटत नाही किंबहुना एवढ्यात उद्धव ठाकरेंचे मातोश्रीहून आदेश गेले असावेत असा टोला भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीतील कुरघोडीवर लगावला आहे.