Maharashtra VIdhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. बारामती विधानसभा मतदारसंघाची राज्यात चर्चा सुरू आहे. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून युगेंद्र पवार निवडणूक लढत आहेत. या मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. आज अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी एक लाख मतांच्या लीडने विजयी होण्याचा दावा केला. या दाव्याला युगेंद्र पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी माध्यामांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवार यांनी एक लाखांच्या लीडच्या केलेल्या दाव्यावर प्रश्न केला , यावेळी त्यांनी २३ तारखेला बघूया असं प्रत्युत्तर दिले.
युगेंद्र पवार म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहे. आमच्या गावांच्या भेटी संपत आल्या आहेत. या मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनीही काम केले आहे. आमच्या काकांचीही संस्था आहे, तेही चांगले काम करत आहेत. आमचेही फाऊंडेशन आहे आम्ही चांगलं काम करत आहे. आम्ही सगळे मिळून विकास करत आहे, असंही पवार म्हणाले.
"आम्हाला विजयाचा विश्वास आहे. उद्या येणारा काळ आपलाच असेल. शरद पवार आपल्या पाठिमागे आहेत. इथली जनता शरद पवार यांच्या पाठिमागे आहे, यापुढेही पाठिमागे राहिले. लोकसभेचे वातावरण अजूनही आहे. या वातावरणात अजूनही वाढ झाली आहे. २३ तारखेला निकाल काय आहे पाहूया. विरोधकांना कोणतेही स्टेटमेंट द्यायला त्यांचा अधिकार आहे, असंही युगेंद्र पवार म्हणाले.
"महायुती १७५ हून अधिक जागा जिंकणार : अजित पवार
अजित पवार म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत १७५ हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य आम्ही समोर ठेवलं आहे. त्यासाठी महायुतीमधील प्रत्येक घटकपक्ष प्रयत्नशील आहे. तशा पद्धतीनं आमचं काम सुरू आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत माहिती देताना अजित पवार म्हणाले की, महायुतीमधील आम्ही तीन प्रमुख पक्ष त्यासह रामदास आठवले यांचा पक्ष आणि इतर मित्रपक्ष यांच्यामध्ये व्यवस्थित समन्वय आहे का, याबाबत आमची चर्चा झाली. राष्ट्रवादीने काय केलं पाहिजे, भाजपानं काय केलं पाहिजे, शिवसेनेनं काय केलं पाहिजे, इतरांनी काय केलं पाहिजे, याबाबतची ती चर्चा होती. तसेच कुणाच्या कुठे सभा घ्यायच्या, याबाबतची चर्चा आम्ही केली.