Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आचारसंहिता लागू झाली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. प्रत्येक वाहनांची तपासणी केली जाते. दरम्यान, काल रात्री खेड-शिवापूर टोल नाक्यावर एका खासगी गाडीतून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. ही रोकड पाच कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या रोकडवरुन आता काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत.
खेड-शिवापूर टोल नाक्यावर सापडलेल्या रक्कमेवरुन आमदार रविंद्र धंगेकर पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले. धंगेकर म्हणाले, ही सगळी यंत्रणा भारतीय जनता पक्षाने हायजॅक केली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांचे आमदार शहाजीबापू पाटील यांची लोक त्यात होती. ज्यावेळी गाडी अडवली त्यावेळी सुरुवातील १५ कोटी आहेत असं सांगितलं. त्या पंधरा कोटीचे पाच कोटीवर कधी आले ते कळलंच नाही. यावेळी सगळे अधिकारी असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. हे पैसे कोणत्या बिल्डरचे आहेत? कोणाचे होते? याची चौकशी न होता. यानंतर त्या ड्राइव्हरने कबुल केले की ते पैसे शहाजीबापू यांचे आहेत. तरीही ते पैसे चौकीत न ठेवता, त्याचा पंचनामा न करता, त्या लोकांना अटक न करता हा सगळा कारभार निवडणूक यंत्रणेचा आहे. पोलिस बंदोबस्तात हे पैसे पोहोचवले जात आहेत, असा गंभीर आरोप आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला.
"निवडणूक आयोगाच्या यंत्रणेला हायजॉक करुन ही यंत्रणा यांच्या हातात आहे. सापडलेले पैसे परत त्यांना पोहोच केले आहेत. हे कुठेही जप्त केलेले नाहीत, जे अधिकारी यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी दाखल केले पाहिजेत, अशी मागणी धंगेकर यांनी केली. हे पैसे जप्त करुन त्याचा पंचनामा केला पाहिजे, या गोष्टीचा मी निषेध करतो. काही दिवसापूर्वी माझ्यावर गुन्हा दाखल केला. आम्ही दिवाळीत गरिबांसाठी काही गोष्टींचे वाटप करतो. यात कुठेही पैसे वाटप करत नाही, साहित्याचा टेम्पो जप्त केला. पुण्याचे कमिशनर भाजपाचा अजेंडा राबवत आहे, असा आरोपही धंगेकर यांनी केला. या पोलिसांना आता हे पैसे दिसत नाही का? असा सवालही धंगेकरांनी केला.