Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून जागावाटपासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. आज वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये खासदार शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून नेत्यांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र होते. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतिश चव्हाण यांचाही समावेश होता, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. खासदार शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक झटका देण्याच्या तयारीत आहेत.
भाजपला नवी मुंबईतही धक्का बसण्याची शक्यता; गणेश नाईक पक्ष सोडण्याच्या विचारात?
आज सकाळपासूनच वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये नेत्यांनी खासदार शरद पवार यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आमदार सतीश चव्हाण यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. बराच वेळ या दोन नेत्यांमध्ये झाल्याचे बोलले जात आहे. सतीश चव्हाण हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहे. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत, यामुळे त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.
आमदार सतीश चव्हाण दोन दिवसात खासदार शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली.
विधानसभा निवडणूक जवळ येईल तशी खासदार शरद पवार राजकीय डाव टाकत असल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आधी भाजपामधून हर्षवर्धन पाटील आणि कागलच्या समरजीतसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, आता पुन्हा एकदा इच्छुक नेत्यांनी पवार यांची भेट घेण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही केली मोठी तयारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला घेरण्याची मोठी तयारी केल्याचे दिसत आहे. अजित पवार गट सांगली जिल्ह्यातील दोन जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. यात तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील इच्छुक आहेत, त्यांनी आज अजितदादांची भेट घेतली. तर दुसरीकडे वाळवा मतदारसंघातही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना घेरण्यासाठी मोठी तयारी केली असल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघातूनही घड्याळ चिन्हावर उमेदवार मैदानात उतरवण्याची तयारी केली असल्याचे बोलले जात आहे.