Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची मुदत होती. राज्यभरात बड्या नेत्यांनी आज अर्ज दाखल केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज तासगात माजी खासदार संजयकाका पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी दिवंगत आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सही केल्याचा गौप्यस्फोट केला. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला.
महायुतीपाठोपाठ मविआचाही आकडा आला; पवारांना ८७, झगडणाऱ्या काँग्रेस-ठाकरेंना किती जागा?
एका मुलाखतीमध्ये बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सिंचन घोटाळ्याबाबत भाष्य केले. चव्हाण म्हणाले, "सिंचन घोटाळा त्यांची पाठ सोडत नाही, मी जेव्हा सिंचन विभागाची श्वेतपत्रिका काढण्याचा आदेश दिला होता.तेव्हा मी माझ्या कार्यकाळात कधीही ७० हजार कोटींचा घोटाळा हा शब्द वापरला नव्हता. ती फाईल माझ्याकडे आली नाही, त्या फाईलवर मी कधीही सही केलेली नाही. त्यामुळे मी सिंचनच्या प्रकरणात ७० हजार कोटींसाठी कोणतीही चौकशी लावलेली नव्हती. त्यावेळी अजित पवार यांनी माझे नाहक सरकार पाडले आणि २०१४ ला भाजपाच्या सरकारची मुहूर्तमेढ केली, असा खोचक टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
तासगावात बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचं षडयंत्र रचले. ७० हजार कोटींच्या सिंचनाचा आरोप केला. अजितराव घोरपडे तेव्हा मंत्री होते. माझ्यावर जो आरोप झाला तेव्हा महाराष्ट्राची निर्मिती होऊन त्यादिवसापर्यंत पगाराचा खर्च ४२ हजार कोटींचा होता. मला ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांचा विश्वास बसेल असं झाले, मग त्यातून एक फाईल तयार झाली ती गृहखात्याकडे आली. तेव्हा आबांनी अजित पवारांनी उघड चौकशी करावी अशी सही केली. केसाने गळा कापायचे धंदे, मला हेदेखील माहिती नव्हते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.
"आपण पृथ्वीराज चव्हाणांचा पाठिंबा काढून घेतला, सरकार गेले, तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू झाली, त्यावेळचे राज्यपाल म्हणाले, मी या फाईलवर सही करणार नाही. नवीन सरकार आले त्याचा मुख्यमंत्री करेल. निवडून आले देवेंद्र फडणवीस सरकार, देवेंद्र फडणवीसांनी सही केली. मला घरी बोलावले, मुख्यमंत्र्याकरता जी सही होती ती त्यांनी केली, तेव्हा गृहमंत्री म्हणून आबांनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते, त्यांची सही दाखवली. मला इतकं वाईट वाटलं. जीवाभावाचा सहकारी होता, आपलं काहीतरी चुकलं असेल त्यामुळे कामाला लावलं असेल असा आरोप अजित पवारांनी आबांवर केला.