Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज भाजपाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांच्या सन्मानार्थ काँग्रेसचा कोणी नेता काही शब्द बोलू शकतो का, असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्यांना उद्धव ठाकरे पाठीशी घालत असल्याची टीका शाह यांनी केली.
'काँग्रेस नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाचा सातत्याने अपमान केला आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. शाह म्हणाले, "मला उद्धव ठाकरेंना विचारायचे आहे, ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना वीर सावरकरांसाठी काही शब्द बोलण्यास सांगू शकतात का? विरोधाभास असताना आघाडीचे सरकार स्थापनेचे स्वप्न घेऊन बाहेर पडलेल्या लोकांना ते सांगतील का? आघाडीचे सारे मनसुबे सत्तेसाठी तुष्टीकरणाचे, विचारसरणीचा अपमान करणारे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीशी गद्दारी करणारे आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला कळले तर बरे होईल, असा टोलाही शाह यांनी लगावला.
अमित शहा म्हणाले की, “केंद्र असो की राज्य, आमचे सरकार स्थापन झाले की आम्ही आमचे संकल्प पूर्ण करतो. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये निवडणूकपूर्व आश्वासने मागे पडली असून महाविकास आघाडीची विश्वासार्हता राहिलेली नाही.
यावेळी अमित शहा यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. यूपीए सरकारमध्ये १० वर्षे मंत्री असताना त्यांनी जनतेसाठी काय केले हे शरद पवारांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगावे, असा सवाल त्यांनी केला.
“महाराष्ट्राने शतकानुशतके प्रत्येक क्षेत्रात देशाचे नेतृत्व केले आहे. भक्ती चळवळ महाराष्ट्रातून सुरू झाली, गुलामगिरीतून स्वातंत्र्याची चळवळही शिवाजी महाराजांनी इथूनच सुरू केली, सामाजिक क्रांतीचीही सुरुवात इथूनच झाली आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षा आमच्या संकल्प पत्रातून दिसून येतात, असंही शाह म्हणाले.