Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 07:26 PM2024-10-24T19:26:02+5:302024-10-24T19:27:23+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली, पण अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटप संदर्भात बैठका सुरूच आहेत. आजपासून राज्यात काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत ४५ उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत.
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
या यादीत भाजपामधून काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या तीन नेत्यांना विधानसभेची उमेदवारी दिली आहे. काही दिवसापूर्वी कागल येथील भाजपामधून समरजीत घाटगे, दोन दिवसापूर्वी बेलापूरमधील संदीप नाईक तर इंदापूर येथील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता, या तीन नेत्यांना आता खासदार शरद पवार यांनी उमेदवारी दिली आहे.
इंदापूर विधानसभेतून माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
इंदापूर येथील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसापूर्वीच भाजपामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यांना आता पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये लढत होणार आहे.
कागल विधानसभेतून समरजीत घाटगे
कागल विधानसभा मतदारसंघातील समरजीत घाटगे यांनी काही दिवसापूर्वीच भाजपामधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता, त्यांनाही उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांना उमेदवारी मिळाली आहे, यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे.
बेलापूर विधानसभेतून संदीप नाईक
संदीप नाईक यांनी दोन दिवसापूर्वी भाजपामधून राष्ट्रावादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. त्यांनाही बेलापूर विधानसभेतून उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात भाजपाने मंदा म्हात्रे यांना उमेदवारी मिळाली आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपा विरोधात राष्ट्रवादी अशी लढत होणार आहे.