Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारसभांना सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभा सुरू आहेत. काल वणी येथे ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरची आणि बॅगांची निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. आज सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी काल ठाकरेंच्या बॅगांची तपासणी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल वणी येथे सभा होती. या सभेसाठी ठाकरे हेलिकॉप्टरने दाखल झाले होते, यावेळी हेलिपॅ़वरच निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली होती. यानंतर काही वेळाने लगेच सांगलीत खासदार अमोल कोल्हे यांच्या बॅगांचीही अधिकाऱ्यांनी तपासणी केली. यामुळे आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी आरोप सुरू केले आहेत.
दरम्यान, आज दुसऱ्या दिवशीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी केल्याचे समोर आले आहे. आज उद्धव ठाकरे यांची औसा येथे सभा होणार आहे, या सभेआधीच निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली आहे.
काल सोमवारी उद्धव ठाकरे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय देरकर यांच्या प्रचारासाठी वणीत दाखल झाले होते. हेलिकॉप्टरमधून उतरताच माजी मुख्यमंत्री ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली. या तपासणीचा व्हिडीओ उद्धव ठाकरेंनी काढला आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. त्यानंतर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हल्लाबोल केला आहे.