Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडी आणि महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन वाद नसल्याचे सांगितले आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज टीव्ही नाई या वृत्तवानीने विशेष मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्रिपदाबाबत भाष्य केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन कोणताही वाद नसल्याचे सांगितले. निवडणुका जिंकणे हेच आमचे लक्ष असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात राज ठाकरेंना फटकारलं
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आमचे सरकार आल्यानंतर धारावीमधील अदानी यांचा प्रकल्प रद्द करणार. मुंबईमध्ये अदानी यांना दिलेल्या जमिनी परत घेणार आहे. मुंबईकरांना घर परवडणारी घरं देणार, असंही ठाकरे म्हणाले. शरद पवार यांना संख्याबळावर मुख्यमंत्री करायचे असेल तरीही मला काहीही प्रोब्लेम नाही. त्यांच्या जागा जास्त आल्या तर जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांनाही मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले तरीही अडचण नाही, असंही ठाकरे म्हणाले.
"आमच्या आघाडीमध्ये काय करायचे आहे, याचे देवेंद्र फडणवीस यांना काय करायचे आहे, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरुन कोणताही वाद नाही, असं स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी दिले.
'अमित ठाकरेंना पाठिंबा देणार नाही'
माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेचे अमित ठाकरे निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात उद्धव ठाकरे अमित ठाकरे यांना पाठिंबा देणार का या चर्चा सुरू आहेत. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी आहे. महाराष्ट्र माझं कुटुंब आहे. कोरोना काळात माझं कुटुंब माझी जबाबदारी मी घेतली. आज ते कुटुंब लुटलं जातंय त्या लुटारूंना अप्रत्यक्षपणे स्वप्नातही पाठिंबा देणार नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असं त्यांनी जाहीर केलंय म्हणजे महाराष्ट्राची लूट मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे महाराष्ट्राच्या लुटारूंना मी स्वप्नातही पाठिंबा देणार नाही आणि महाराष्ट्र प्रेमींनीही महाराष्ट्राच्या लुटारूंना पाठिंबा देऊ नये असं आवाहन करत राज ठाकरेंना नाव न घेता फटकारलं. टीव्ही ९ नं घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.