Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची मुदत होती. राज्यभरात बड्या नेत्यांनी आज अर्ज दाखल केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज तासगात माजी खासदार संजयकाका पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी दिवंगत आर. आर. पाटील यांनी सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर सही केल्याचा गौप्यस्फोट केला. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
आज पत्रकार परिषदेत बोलनाता नाना पटोले यांनी अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. पटोले म्हणाले, अजित पवार आता भाजपाबरोबर गेले आहेत, भाजपाने त्यांना वॉशिंग मशिनमध्ये स्वच्छ केले. आता दिवंगत आर आर पाटील यांच्या सारख्या व्यक्तीला नसताना बदनाम करणे हे सगळ्यात मोठे पाप आहे.भाजप आणि अजित पवार आपली पाप लपवण्यासाठी एका चांगल्या व्यक्तीमत्वाला बदनाम करण्याच काम करत आहेत, असा निशाणा नाना पटोले यांनी अजित पवार यांच्यावर साधला. या राजकारला आता जनता धडा शिकवेल, असंही पटोले म्हणाले.
"या सरकारने मच्छिमारांचे जीवन उद्धस्त केले आहे. आता मच्छिमारांवर मनाई आदेश काढून त्यांच्यावर अन्याय केला आहे. अनेक जाती धर्मात भांडण लावण्याचा प्रकार या सरकारने केला आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम यांनी केला आहे, असा आरोपही नाना पटोले यांनी केला.
अजित पवार काय म्हणाले?
तासगावात बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचं षडयंत्र रचले. ७० हजार कोटींच्या सिंचनाचा आरोप केला. अजितराव घोरपडे तेव्हा मंत्री होते. माझ्यावर जो आरोप झाला तेव्हा महाराष्ट्राची निर्मिती होऊन त्यादिवसापर्यंत पगाराचा खर्च ४२ हजार कोटींचा होता. मला ७० हजार कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. आकडा जेवढा मोठा तेवढा लोकांचा विश्वास बसेल असं झाले, मग त्यातून एक फाईल तयार झाली ती गृहखात्याकडे आली. तेव्हा आबांनी अजित पवारांनी उघड चौकशी करावी अशी सही केली. केसाने गळा कापायचे धंदे, मला हेदेखील माहिती नव्हते, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.