Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 04:10 PM2024-11-19T16:10:09+5:302024-11-19T16:11:47+5:30
Vinod Tawde : भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे, या प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे.
Vinod Tawde ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर नालासोपारा येथे पैसे वाटल्याचा आरोप बविआचे आमदार, उमेदवार क्षितीज ठाकूर यांनी केला आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने आता लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. तावडे यांच्यासह भाजपचे उमेदवार राजन नाईक यांच्यावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पैसे वाटल्याच्या आरोपांवर विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. हा आपल्याविरुद्धचा कट असून निवडणूक आयोगाने याची निःपक्षपातीपणे चौकशी करावी, असं तावडे यांनी सांगितले आहे. विनोद तावडे म्हणाले की, मी कार्यकर्त्यांना भेटायला गेलो होतो. मी काहीही चुकीचे केले नाही. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा हा डाव आहे. पोलीस आणि निवडणूक आयोगाने याची चौकशी करावी, असंही तावडे म्हणाले.
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा गंभीर आरोप आहे. विरार येथील हॉटेलमध्ये पैसे वाटण्यासाठी विनोद तावडे पाच कोटी घेऊन आल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला. विनोद तावडे म्हणाले की, मला आणि माझ्या पक्षाला बदनाम करण्याचा हा डाव आहे. सीसीटीव्ही फुटेज काढून तपास करावा.
आमचा मित्र पक्ष आहे, ते म्हणतायत की मी पैसे वाटत होतो. हे ठाकूर मला ओळखतात मी ४० वर्षे पक्षाचे काम करतो. नालासोपारामध्ये वाड्याहून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आमच्या समोरच्या पक्षाचा असा समज झाला की मी पैसे वाटायला आलो. सगळे चेक करा काहीच करायला हरकत नाही असे मी म्हटले, असे तावडे म्हणाले.