Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीत महिला उमेदवारांविरोधात अशोभनीय वक्तव्य केल्याबाबत निवडणूक आयोगाने कडक भूमिका घेतली आहे. याशिवाय महिलांबाबत आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
याबाबत निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना सल्ला सूचना दिल्या आहेत.निवडणूक प्रचारादरम्यान तसेच सार्वजनिक जीवनात महिलांबद्दल अपमानास्पद आणि असभ्य टिप्पणी करणे टाळावे, अशा सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात राज्यभरातील जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आयोगाने शुक्रवारी हे निर्देश दिले आहेत.
या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकही उपस्थित होते. निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातून ज्या प्रकारच्या तक्रारी येत आहेत त्या त्रासदायक असल्याचे आयोगाने म्हटले आहे. यामध्ये महिला उमेदवारांबद्दल असभ्य आणि आक्षेपार्ह टिप्पणी केली जात आहे.
अशा प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयोगाने अधिकाऱ्यांना दिले. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शायना एनसी यांच्या विरोधात काही दिवसापूर्वी केलेल्या टीके संदर्भात निवडणूक आयोगाची कठोरता दिसून येत आहे.
सावंत यांनी केलेल्या टीकेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया आल्या होत्या. भाजपनेही त्यांना घेरले आणि महिलांबाबत अयोग्य टिप्पणी करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल, असं प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाच्या उमेदवाराबाबत आक्षेपार्ह टीका केल्याचे समोर आले होते. या विधानानंतरही आरोप-प्रत्यारोप झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळीही महिलांबाबत आक्षेपार्ह टीकेबाबत आयोगाने कठोर भूमिका दाखवली होती, त्यांनी कंगना राणौत यांना नोटीसही बजावली होती आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेट यांनी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर त्यांच्याकडून उत्तर मागितले होते.