Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 03:16 PM2024-11-19T15:16:50+5:302024-11-19T15:22:03+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज विरार येथे भाजपा नेते विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बविआ'ने केला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : निवडणुकीच्या आदल्या दिवशीच विरारमध्ये भाजपा नेते विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा आरोप बविआ'ने केला आहे. विरार येथील एका हॉटेलमध्ये बविआ कार्यकर्त्यांनी राडा घातला. मागील ३ तासांपासून विनोद तावडे त्या हॉटेलमध्ये अडकून होते. दरम्यान, आता यावरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपा नेते विनोद तावडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी विनोद तावडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. पोस्टमध्ये म्हटले आहे की, अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरार येथील एका हॉटेल मध्ये पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले गेल्याचा व्हिडिओ समाजमाध्यामांवर फिरत आहे. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांच्यावर कडक कारवाई करायला हवी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
"लोकांचा लोकशाहीवरील विश्वास टिकून ठेवण्यासाठी आणि निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी विनोद तावडे यांना अटक करावी, अशी आमची मागणी आहे, असंही पटोले यांनी म्हटले आहे.
'विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप'
हितेंद्र ठाकूर यांनी आरोप केला की, मला भाजपावाल्यांचा फोन आला, तावडे ५ कोटी घेऊन येतायेत, इतका मोठा नेता पैसे का घेऊन येतील असं मला वाटलं. पण जेव्हा इथं आलो तेव्हा पैसे वाटप सुरू असल्याचं दिसलं. तावडे आल्यापासून इथं सीसीटीव्ही बंद होते, त्यामुळे हॉटेलवरही कारवाई व्हायला हवी. मला डायरी मिळाली, निवडणूक आयोग आणि पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली.
अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला!
— Nana Patole (@NANA_PATOLE) November 19, 2024
भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरार येथील एका हॉटेल मध्ये पैसे वाटप करताना रंगेहाथ पकडले गेल्याचा व्हिडिओ समाजमाध्यामांवर फिरत आहे. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने विनोद तावडे यांच्यावर कडक कारवाई करायला हवी.
संविधान आणि… pic.twitter.com/feKv8zQ7v1
भाजपा नेत्यांनी काय सांगितले?
विनोद तावडे हे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस असून अशाप्रकारे ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करतायेत हे मुळात हास्यास्पद आहे. कालपासून महाविकास आघाडीने निवडणूक आपल्या हातातून गेली हे त्यांच्या वर्तनातून आणि वागण्यातून दिसून येते. उद्याच्या निवडणुकीत पराभव स्पष्ट दिसतोय. लोकसभेच्या निवडणुकीत खोटं नरेटिव्ह सेट करून महाराष्ट्रात यश मिळाले. प्रचार सभा संपेपर्यंत महाविकास आघाडीने सभा, माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून काही नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. सत्ताधारी पक्षाने विरोधकांचे सगळे दावे चुकीचे आहेत हे सांगण्यात यशस्वी ठरलो असं भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.