Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :गेल्या काही दिवसापासून राज्यात सुरू असणाऱ्या प्रचारसभा काल संपल्या. उद्या मंगळवारी मतदान होणार आहे. काटोल विधानसभा मतदारसंघात यावेळी मोठी लढत होत आहे. महाविकास आघाडीकडून सलील देशमुख निवडणूक लढत आहेत. दरम्यान, काल सांगता सभा आटोपून परत येताना अनिल देशमुख यांच्या गाडीवर चार अज्ञात युवकांनी दगडफेक केल्याची घटना सोमवारी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात देशमुख जखमी झाले. दरम्यान, आता या घटनेवर देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.अनिल देशमुख यांनी भाजपाला इशारा दिला आहे.
"या भारतीय जनता पार्टी वाल्यांना मी सांगू इच्छितो की, अनिल देशमुखांवर तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा. अनिल देशमुख मरणार नाही आणि आम्ही लोक तुम्हाला सोडणारही नाही, असा इशाराही अनिल देशमुख यांनी भाजपाला दिला.
काटोल मतदारसंघातील नरखेड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचाराची सांगता सभा आटोपून अनिल देशमुख हे तीनखेडा-भिष्णूर मार्गाने परत येत असताना काटोल-जलालखेडा रोडवरील बेल फाट्याजवळील ब्रेकरजवळ गाडी आली असता चार युवक अचानक गाडीसमोर आले. यातील एकाने गाडीच्या काचेवर दगडफेक केली. यानंतर एक मोठा दगड देशमुख यांच्या कपाळाला लागला. यात रक्तस्राव झाल्याने देशमुख यांची प्रकृती बिघडली. लगेच त्यांना उपचारासाठी काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.
अनिल देशमुख यांना नागपूर येथील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच काटोल येथील ग्रामीण रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. देशमुख यांच्यावरील हल्ल्याची माहिती मिळताच काटोल पोलिसांचा ताफाही ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला. या ठिकाणी निर्माण झालेली तणावाची परिस्थिती पाहता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज देशमुख यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.