"त्यांनीच सांगितलं होतं दोन तीन महिने थांबून येतो"; राजेंद्र शिंगणेंबाबत जयंत पाटलांचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 04:33 PM2024-11-07T16:33:21+5:302024-11-07T16:46:07+5:30
सिंदखेडराजाचे आमदार राजेंद्र शिंगणे यांच्याबाबत जयंत पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे.
Rajendra Shingane : माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काही दिवसांपूर्वी घरवापसी केली होती. राजेंद्र शिंगणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राजकारण-समाजकारणात केवळ शरद पवार यांच्यामुळे मोठे होण्याची संधी मिळाल्याचे शिंगणे यांनी म्हटलं होतं. आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राजेंद्र शिंगणे यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी अजित पवारांसोबत जात असल्याचे शिंगणे यांनी सांगितले होते असं म्हटलं आहे.
राजेंद्र शिंगणे यांनी १९ ऑक्टोबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत ष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. राजेंद्र शिंगणे हे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१९ मध्ये पहाटेच्या शपथविधीवेळी आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर शिंगणे यांनीनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा एकदा आपण शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचं स्पष्ट करत पक्षात प्रवेश केला.
मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये जयंत पाटील यांनी राजेंद्र शिंगणे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. "२०१९ मध्ये काही लोकांना न सांगता शपथविधीसाठी घेऊन जाण्यात आलं होतं. शरद पवार यांची याला साथ नसल्याचे कळल्यानंतर ते लगेच सिल्वर ओकला भेटायला आले. यावेळी देखील सगळ्यांचे प्रतिज्ञापत्र तयार करून घेण्यात आले. सगळ्यांना लेखी टाकी बांधून घेण्यात आलं. त्यामुळे राजेंद्र शिंगणे त्या ठिकाणी अडकले. त्यांच्या जिल्ह्यातले काही प्रश्न होते. त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की दोन महिने तिथे थांबतो माझा प्रश्न संपला जिल्हा मध्यवर्ती बँके संदर्भात त्यांनी आश्वासन दिलं की मी तुमच्याकडे येतो. शरद पवारांना भेटून सुद्धा त्यांनी हेच सांगितलं होतं. मनाने ते आमच्याकडे होतं. अजून पाच सात जण राहिले आहेत नाहीतर तेही आले असते. त्यांचं काम झालं होतं पण तोपर्यंत आम्हाला उमेदवार मिळाले," असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
दरम्यान, राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर दुसरीकडे शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. गायत्री शिंगणे यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. गायत्री शिंगणे राष्ट्रवादीकडून राजेंद्र शिंगणेच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत. गद्दारी करुन गेलेल्या राजेंद्र शिंगणे यांना पक्षात घेणं चुकीचं असल्याचे गायत्री शिंगणे यांनी म्हटलं होतं.