Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. भाजपाने प्रचाराला सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील धुळ्यात 'एक हैं तो सेफ हैं' असा नारा देत प्रचारसभांना सुरुवात केली. दरम्यान, आता भाजपाच्या या नाऱ्याला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
आमदार जयंत पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करुन प्रत्युत्तर दिले. पोस्टमध्ये जयंत पाटील म्हणाले, 'हम सब नेक है… तुमच्या तोडफोडीला, समाजात ‘फोडा, झोडा आणि राज्य करा’ या नितीला आमच्या महाविकास आघाडीकडून ‘हम सब नेक है’ हेच उत्तर आहे, असं प्रत्युत्तर जयंत पाटील यांनी दिले.
मी मुख्यमंत्री व्हायचे जरी म्हटले तरी वरचे मंत्रीपद जाईल; आठवलेंनी खास शैलीत केली 'इच्छा' व्यक्त...
'आम्ही महाराष्ट्राधर्मावर प्रेम करणारे नागरिक नेक म्हणजेच सभ्य आहोत. या देशात जन्म झालेले सर्व नागरिक एकही आहेत, सेफही आहेत आणि नेकही आहेत, हिच आमची धारणा आहे.
म्हणूनच तुमच्या समाजात फूट पाडण्याच्या खेळीला आम्ही महाराष्ट्रातील सभ्य नागरिक बळी पडणार नाही, महाराष्ट्र धर्मासाठी आम्ही नेकी ठेवून लढणार आणि जिंकणार!, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
शुक्रवारी विरोधकांवर निशाणा साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक हैं तो सेफ है चे विधान केले होते. महाविकास आघाडीच्या वाहनाला ना चाके आहेत ना ब्रेक. ड्रायव्हरच्या सीटवर कोण बसणार यावरून भांडण सुरू आहे. जनतेची लूट करणे हेच त्यांचे राजकारणातील उद्दिष्ट आहे. पंतप्रधान म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार विकासात अडथळे निर्माण करते, अशी टीका मोदींनी केली होती. दरम्यान, आता भाजपाच्या या स्लोगनवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.