चंद्रपूर - मागील निवडणूक सर्वाधिक मतांनी निवडून आलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असं निश्चित झालं होतं. मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशाला काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विरोध केला आहे. त्यामुळे जोरगेवारांना महाविकास आघाडीकडून मिळणारी उमेदवारी धोक्यात आली. त्यानंतर महायुतीकडूनही भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी किशोर जोरगेवार यांना विरोध केला आहे. मुनगंटीवारांनी दिल्ली गाठून चंद्रपूरातील जोरगेवारांच्या महायुतीतील प्रवेशाला रोखलं आहे. त्यामुळे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे पुन्हा अपक्षच निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत.
याबाबत आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, जेव्हा एखादा बहुजन समाजातील गरीब, कष्टकरी कार्यकर्ता मोठा होतो, त्याच्यात नेतृत्व करण्याची वेळ येते तेव्हा प्रस्थापित विरोध करतात. हे मी पहिल्यांदा अनुभवतोय असं नाही. २०१९ मध्येही हीच स्थिती होती. २०१९ मध्ये काँग्रेसने माझा प्रवेश करून घेतला. मला एबी फॉर्म दिला, त्यानंतर ऐनवेळी उमेदवारी दुसऱ्याला दिली. निकालात काँग्रेस उमेदवाराला १४ हजार मते मिळाली, तर मला काँग्रेस उमेदवारापेक्षा १ लाख ३ हजार मते जास्त मिळाली. देशात सर्वाधिक ७३ हजारांच्या मताधिक्याने अपक्ष म्हणून मी निवडून आलो. तीच स्थिती भाजपाची झाली. भाजपाचा उमेदवार ४४ हजार मतांवर थांबला. गेल्या ७५ वर्षात देशात अपक्षांच्या इतिहासात मी ७३ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेला पहिला अपक्ष आमदार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच कार्यकर्त्यांना प्रामाणिक काम करणारा, कष्ट करणारा नेता हवा असतो अशी भावना असते. परंतु जे प्रस्थापित आहेत त्यांना दुसऱ्याने इथं येऊन नेतृत्व करावं अशी भूमिका नसते. त्यामुळे हेच चित्र चंद्रपूरात आज दिसत आहे. लोकसभेला शेवटच्या २ दिवसांत मला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी फोन करून तुम्हाला मुनगंटीवारांचं काम करावं लागणार आहे अशा सूचना दिल्या. मी महायुतीचा घटक म्हणून त्यांचे काम केले होते असं आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटलं.
दरम्यान, आजच्या क्षणापर्यंत माझा कुणाशीही संपर्क नाही. तुतारी चिन्हावर लढण्यासाठी माझ्याकडे काही दिवसांपूर्वी संपर्क झाला होता. मात्र काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याविरोधामुळे पक्षप्रवेश थांबलेला आहे. मी मुंबईतच आहे. येणारी निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. जर दोन्ही पक्षाचे नेते आपल्याला विरोध करतायेत मग आपण जायचं कशाला अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. जनतेसमोर मी जाणार आहे. लोकशाहीत बहुपक्षीय, अपक्ष उभे राहू शकतात हे बाबासाहेबांना ७५ वर्षापूर्वी कळलं होते. त्यामुळे संविधानात ते आहे. मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे असं किशोर जोरगेवार यांनी घोषित केले आहे.