Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटची मुदत होती. आज राज्यभरात अर्ज दाखल करण्यासाठी नेत्यांची गडबड सुरू होती, महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अनेक मतदारसंघात दोन, दोन नेत्यांनी उमेदवारीची मागणी केली होती. काही नेत्यांना उमेदवारी मिळाली नसल्यामुळे उघड-उघड नाराजी व्यक्त केली तर महायुतीमधील काही नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. यामुळे विधानसभा निवडणुकीआधच महायुतीचे टेन्शन वाढले आहे.
महायुतीच्या जागावाटपाचा फायनल आकडा समोर, भाजपा १४८, शिंदे गट आणि अजित पवार गटाला किती जागा? पाहा
भाजपला बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात यश आलेले नाही. ज्या जागांवर पक्षाला विजयाची चांगली शक्यता मानली जाते त्या जागांवर बंडखोर मोठ्या संख्येने लढत आहेत. यामुळे माहयुतीच्या अडचणी वाढल्या आहेत.
मुंबादेवी विधानसभा
शायना एनसी यांना मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून काल शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर केली. पण याच मतदारसंघात आता भाजपाच्या अतुल शाह यांनी बंडखोरी केल्याचे समोर आले आहे.
शिराळा विधानसभेत सम्राट महाडिक
सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघात भाजपाने सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी दिली, पण भाजपाचे सम्राट महाडिक नाराज असल्याचे समोर आले आहे. महाडिक यांनी काल अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अर्ज पाठिमागे घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे या विधानसभेतही महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत.
बोरवली विधानसभा मतदंरसंघ
पश्चिम बोरवली विधानसभा मतदारसंघात भाजपाने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली, पण भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, आता या मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ
भाजपने अकोला पश्चिम विधानसभेतून विजय अग्रवाल यांना तिकीट देण्याची घोषणा केली आहे. अग्रवाल यांची उमेदवारी जाहीर होताच निवडणूक लढवू इच्छिणारे भाजपच्या ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस डॉ.अशोक ओळंबे यांनी निवडणूक लढविण्याची भूमिका कायम ठेवली. त्यांनी भाजपाला राजीनामा देत प्रहारमधून आपला अर्ज दाखल केला आहे.
वांद्रे पूर्व जागेवरही आव्हान वाढले आहे. येथे अजित पवार गटाने झीशान सिद्दिकी यांना, तर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कुणाल सरमळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.