Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, दरम्यान, आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आपली भूमिका मांडली आहे.'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी', अशी स्पष्ट भूमिका लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे.
आज पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका मांडली. लक्ष्मण हाके म्हणाले, या महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माझी विनंती आहे की आपलं बहुमुल्य मत योग्य त्या माणसाला आणि योग्य पक्षाला द्या. या वर्षभराच्या कालावधीत ज्या आमदार, खासदार, लोकप्रतिनीधींनी जरांगे यांना लेखी पत्र दिले तिच माणसं आपल्याकडे मत मागायला येत आहेत, त्यांना मागील काळात काय केलं याचा जाब विचारा, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.
"कुणबी आणि मराठा एक आहे हे सांगितलं कुणी ? महाराष्ट्राला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करु नका. मराठा समाजाला कुणबी मानने म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे, हीच भूमिका मी घेत आलो पण याला शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी फासला आहे, असा टोलाही लक्ष्मण हाके यांनी लगावला.
'तुतारीची टोळी महाराष्ट्रात भामटेगिरी करते, ओबीसी- मराठा बांधवांमध्ये जरांगे यांनी तेढ निर्माण केला त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसणार आहे. २८८ विधानसभा मतदारसंघ सोडून जरांगे फक्त येवला मतदारसंघात गेला. या माणसाला ओबीसीने आता ओळखले आहे, उत्तमराव जाणकर यांना तिकीट दिले ओबीसी वेडा वाटतो का ?, असा सवालही लक्ष्मण हाके यांनी केला.
'महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी'
लक्ष्ण हाके म्हणाले, महाविकास आघाडीला मतदान करण्यापेक्षा महायुतीला मतदान करा.'दगडा पेक्षा वीट बरी'प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी, असंही हाके म्हणाले.