Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. भाजपाचे केंद्रीय नेते राज्यात जाहीर सभा घेत आहेत, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही सभांचा सपाटा लावला आहे. खासदार शरद पवार यांनीच्याही दररोज चार ते पाच सभा होत आहेत. दरम्यान, सभेवरुन खासदार शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यात वाद झाल्याचा किस्सा खासदार सुळे यांनी आज नाशिक येथील जाहीर सभेत सांगितला.
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली, तसेच खासदार शरद पवार यांच्या सभेवरूनही भाष्य केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ८० वर्षाच्या योद्धाने परत सगळ उभ करुन दाखवलं. त्यांनी आता हद्दच केली, काल रात्री माझं शरद पवार यांच्यासोबत भांडण झालं. काल त्यांनी एका दिवसात सात सभा केल्या. मी काल त्यांच्यावर आवाज चढवला. मी म्हणाले काय चाललंय ते म्हणाले तु गप्प बस, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
'चांगल्या सरकारसाठी लढताहेत'
"हे सगळं कशासाठी सुरू आहे, ते मुख्यमंत्री होणार आहेत का? ते स्वत: सत्तेत बसणार आहेत का? त्यांना फक्त राज्यात चांगली सत्ता येऊदे आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव यासाठी लढत आहेत, असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"महिलेला स्वाभीमानाने उभ राहता आले पाहिजे. माझं केंद्रातील सरकारसोबत कांद्यासाठी लढाई झाली. आम्ही कांद्याचा प्रश्न मांडतो. ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिले, त्यांच्यासाठी आम्ही लढत आहोत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"लोकसभा निवडणुकीवेळी बहीण लाडकी का नव्हती, फक्त मतांसाठी यांच्यासाठी बहीण लाडकी झाली आहे. १५०० रुपये देऊन लाडकी बहीण नावाची योजना आणली. सगळी नाती पैशाने विकत घेता येत नाहीत. या देशात ५० खोके सगळे एकदम ओके आहेत, असा टोलाही खासदार सुळे यांनी महायुतीवर लगावला.