Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ज्यांनी गद्दारी केली, त्यांना सुट्टी नाही, माझा एकच शब्द वळसे पाटलांना पराभूत करा'; शरद पवारांनी डागली तोफ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 09:21 PM2024-11-13T21:21:43+5:302024-11-13T21:23:31+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. मागील वर्षी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात खासदार शरद पवार यांच्या जवळचे मानले जाणारे दिलीप वळसे पाटील यांचाही समावेश होता. दरम्यान, आता खासदार शरद पवार विधानसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत.
आज खासदार शरद पवार यांनी आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी दिलीप वळसे पाटील यांचा पराभव करा असं सांगितलं. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
निवडणूक अधिकाऱ्यांचा धडाका! ठाकरेंची सलग तीन दिवस, तर शिंदे-फडणवीस-पवार यांची एकाच दिवसात बॅग तपासणी
खासदार शरद पवार म्हणाले, ज्यांना मी शक्ती दिली. ज्यांना मी अधिकार दिला. ज्यांचा मी सन्मान केला, त्यांच्याकडून मला काही नको. आज लोक त्यांच्यावर नाराज आहेत, त्यांनी आम्हा लोकांची साथ सोडली, आमचा शब्द पाळला नाही. विरोधकांच्याबरोबर मंत्रिमंडळात बसले हे लोकांना आवडलं नाही. हे लोक सांगत असतात, लोकांना खोट सांगतात, आमचे आणि पवार साहेबांचे संबध चांगले आहेत असं लोकांना सांगतात. पण असं काही सुद्धा नाही. माझी बायको वर्षातून एकदा भीमाशंकरला दर्शनाला येतात. आम्हा लोकांची साथ सोडल्यानंतर आता परवा त्या भीमाशंकरला गेल्या होत्या. तेव्हा मी त्यांना विचारलं तुमची व्यवस्था कोणी केली. तेव्हा त्या म्हणाल्या मी डायरेक्ट दर्शनाला गेलो, त्या म्हणाल्या ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही. आम्ही डायरेक्ट भीमा शंकरच्या दारात गेलो, असंही शरद पवार म्हणाले.
दिलीप वळसे पाटलांवर साधला निशाणा
"दिलीप वळसे पाटील सांगतात, निवडणुका जवळ आल्या शरद पवार येतील माझ्याबद्दल काही बोलणार नाहीत. यांच्याबद्दल आता काय बोलायचं, यांनी बोलायला काहीच ठेवलेले नाही. त्यांनी एकच गोष्ट ठेवली त्यांनी गद्दारी केली. जो गद्दारी करतो त्या गद्दाराला शिक्षा द्यायची असते. ३५० वर्षापूर्वी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजेंच्यासोबत गणोजी शिर्के यांनी गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही. गणोजीला आता सुट्टी नाही, ज्यांनी गद्दारी केली आता त्यांना सुट्टी नाही. आता या निवडणुकीत वळसे पाटील यांना पराभूत करा, असा निशाणा खासदार शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर लगावला.