Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :अजितदादांनी १५ नेत्यांना दिले एबी फॉर्म; कोणत्या आमदारांना मिळाली संधी? वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 06:23 PM2024-10-21T18:23:36+5:302024-10-21T18:31:51+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज १५ नेत्यांना एबी फॉर्म दिले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. काल भाजपाने ९९ जागांची घोषणा केली. तर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १६ उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. पवार यांनी यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म वाटण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडू आज सायंकाळी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
जरांगे फॅक्टरला उत्तर, भाजपचा प्लान ठरला; मराठवाड्यातील १६ पैकी किती ठिकाणी मराठा उमेदवार दिले?
बारामती विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगण्यात येत आहे. बारामती येथे प्रचारासाठी गाड्याही सज्ज झाल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून महायुतीमध्ये जागावाटपाची चर्चा सुरू होती, अखेर काल जागावाटप पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल भाजपाने पहिली यादी जाहीर केली, या यादीत ९९ नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर उद्या शिंदे गटाची यादी जाहीर होणार असल्याचे बोलले जात आहे.
अजित पवार यांनी या नेत्यांना दिले एबी फॉर्म
छगन भुजबळ, अतुल बेनके, नरहरी झिरवळ, दत्तात्रय भरणे, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, राजेश विटेकर, चेतन तुपे, सुनिल टिंगरे, दौलत दरोडा, राजेश पाटील, आशुतोष काळे, हिरामण खोसकर, भरत गावित, बाबासाहेब पाटील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि वाळवा विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष दिल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघात भाजपातील नेत्यांना घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याचे बोलले जात आहे. वाळवा मतदारसंघात भाजपाच्या निशिकांत पाटील यांना तर तासगाव विधानसभेतून माजी खासदार संजयकाका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांना घड्याळ चिन्हावर उतरवले जाणार असल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे, बुलढाणा विधानसभेतील आमदार राजेंद्र शिंगणे यांनी अजित पवार गटातून बाहेर पडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला झटका बसला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनीही शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सतीश चव्हाण (Satish chavan) यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्याच ठपका ठेवत आमदार चव्हाण यांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी याबाबतचा आदेश काढला.
आमदार सतीश चव्हाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. बराच वेळ या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. सतीश चव्हाण हे सध्या विधान परिषदेचे आमदार असून, गंगापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.