कणकवली : निवडणुकीत जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदार, एक माजी खासदार व एक माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचाराची धावपळ अधिक वाढल्याने उत्कंठा ताणली गेली आहे.
जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तिन्ही मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्येच खरी लढत होणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तिन्ही पक्षाना एकही जागा सुटलेली नाही. त्यामुळे त्यांचे उमेदवार रिंगणात नाहीत.
कणकवली मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे आमदार नितेश राणे, महाविकास आघाडीकडून उद्धवसेनेचे उमेदवार संदेश पारकर निवडणूक रिंगणात आहेत.
सावंतवाडीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चा दावा असतानाही उद्धवसेनेने माजी आमदार राजन तेली हे उमेदवार दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) कडून तयारी करीत असलेल्या अर्चना घारे-परब या अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. तर भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब हेही निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर महायुतीकडून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर पुन्हा निवडणूक लढवीत आहेत.
अपक्ष, बंडखोरांनी लावली ताकद
सावंतवाडी मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे. अपक्ष उमेदवार म्हणून या बंडखोर उमेदवारांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे. त्यामुळे सुरुवातीला सरळ वाटणारी या मतदार संघातील निवडणूक चौरंगी होत आहे. महायुती आणि आघाडीसमोर बंडखोरांनी आव्हान उभे केले आहे. तिन्ही विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची चुरस वाढली असून, प्रचारात कोणतीच कसर सोडली जात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.