राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 05:28 AM2024-11-27T05:28:38+5:302024-11-27T05:59:02+5:30
एकनाथ शिंदे यांचा राजीनामा, आता काळजीवाहू मुख्यमंत्री, मुख्यमंत्रिपदाचे नाव ३० नोव्हेंबरपर्यंत नक्की होईल आणि त्यानंतर शपथविधी होईल, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना सांगितले.
मुंबई - चौदाव्या विधानसभेची मुदत संपल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी राजभवन येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा दिला. राज्यपालांनी तो स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र त्यांना दिले. यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दीपक केसरकर, दादाजी भुसे आणि चंद्रकांत रघुवंशी आदी उपस्थित होते.
शिंदे यांनी राजीनामा दिल्याने राज्य मंत्रिमंडळही बरखास्त झाले आहे. त्यामुळे या सरकारमधील सगळे मंत्री आता माजी मंत्री झाले आहेत. २४ नोव्हेंबरला आयोगाकडून पंधराव्या विधानसभेसाठी निवडून आलेल्या २८८ सदस्यांची यादी राज्यपालांना सादर करण्यात आली. राजपत्रही प्रसिद्ध करण्यात आले. त्यामुळे आता पंधरावी विधानसभा अस्तित्वात आली आहे.
भाजपचे निरीक्षक कधी?
शिंदेसेनेने एकनाथ शिंदे यांना, तर अजित पवार गटाने अजित पवार यांना आधीच विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडले आहे. भाजपबाबत प्रतीक्षा आहे. सूत्रांनी सांगितले की, येत्या दोन दिवसांत भाजपच्या आमदारांची नेता निवडीसाठी मुंबईत बैठक होईल. या बैठकीसाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक येणार आहेत. ही बैठक गुरुवारी होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्रिपदी कोण ३० नोव्हेंबरपर्यंत ठरणार
मुख्यमंत्रिपदाचे नाव ३० नोव्हेंबरपर्यंत नक्की होईल आणि त्यानंतर शपथविधी होईल, असे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांना सांगितले. त्यावरून २ डिसेंबरला शपथविधी होईल असा तर्क दिला जात आहे.
शब्द दिला नव्हता : दानवे
भाजपाने शिंदेसेनला किंवा शिंदेसेनेने भाजपला मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द दिलेला नव्हता, असे भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले. शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय तिघांनाही मान्य असेल. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे म्हणाले की, येत्या दोन-तीन दिवसांत सरकारचा मार्ग सुकर झालेला दिसेल.
आठवलेंच्या विधानाला शिंदेसेनेचे प्रत्युत्तर
शिंदे यांना भाजपाने निर्णय कळविला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असतील, हेही त्यांना सांगितले आहे. शिंदे यांनी दिल्लीच्या राजकारणात गेले पाहिजे, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. त्यावर, शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाच्या निर्णय प्रक्रियेत आठवले नसतात. तीन पक्षांचे शीर्षस्थ नेते बसून या पदाबाबतचा निर्णय घेतील. आमच्या पक्षाला कोणताही निरोप भाजपाकडून आलेला नाही.