बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी १ लाख १६ हजारांच्या मताधिक्यासह ऐतिहासिक विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होत असलेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई झाली होती. अजित पवार यांना त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी घेत आव्हान दिलं होतं. मात्र अजित पवार यांना पुन्हा एकदा या मतदारसंघावर आपलं वर्चस्व सिद्ध करत मोठा विजय मिळवला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी निवडणूक निकालानंतर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं. दादांच्या विरोधात उमेदवार देऊन तुतारी गटाने चूक केली हे कबूल करावं" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. "जी व्यक्ती खालच्या पातळीवर जाऊन टीका करत होती. त्या खासदार कोल्हेंना आम्हाला विचारायचं आहे, ज्या पद्धतीने गद्दारीचा डाग, काळा डाग, गुलाबी जॅकेट असं तुम्ही बोलत होता तर आज तुम्ही मीडियासमोर येऊन का धमक दाखवू शकत नाही."
"लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. ती दानत फक्त अजित दादांमध्ये होती की, बारामती लोकसभेच्या निवडणुकीतील पराभवासुद्धा जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला. माझ्याकडून चूक झाली हे त्यांनी प्रामाणिकपणे कबूल केलं. आज तरी कबूल करा... बारामतीमध्ये अजितदादांच्या विरोधात उमेदवार देऊन तुतारी गटाने चूक केली होती. हे कबूल करण्याचं औदार्य सुप्रिया सुळे यांनी दाखवावं, एवढी आमची अपेक्षा आहे" असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
बारामती मतदारसंघातून अजित पवार यांना एकूण १ लाख ९६ हजार ६४० मते मिळाली, तर युगेंद्र पवार यांना अवघ्या ८० हजार ४५८ मतांवर समाधान मानावं लागलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार असे निवडणुकीचे समीकरण सुरू झाले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार या काका-पुतण्यांनी बारामतीच्या इतिहासात प्रथमच एकमेकांविरोधात शड्डू ठोकला होता. त्याची सुरुवात लोकसभेपासूनच झाली. यामध्ये सुळे विरोधात उपमुख्यमंत्री पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरविण्यात आले. यामध्ये सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र आता अजित पवारांनी दमदार कमबॅक करत विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे.