Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 10:04 AM2024-11-26T10:04:21+5:302024-11-26T10:05:11+5:30
आरएसएसनेही फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शिंदेंनी आणल्यामुळे त्यातून विधानसभा निवडणुकीत यश मिळालं असं शिंदेसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
मुंबई - महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीला निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावं यासाठी शिंदेसेनेकडून दबावतंत्र वापरण्यात येत आहे. त्यात सर्वाधिक जागा मिळवून नंबर वन ठरलेल्या भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आग्रही आहेत. फडणवीसांना मुख्यमंत्री करावं ही जनतेची मागणी असून त्यांनीच राज्याचे नेतृत्व करावे अशी मागणी भाजपा आमदार करत आहेत. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी लांबणीवर पडला आहे.
महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागा जिंकल्या आहेत तर भाजपाने १३२ जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून इतरांसह अपक्ष ५ आमदारांनी भाजपाला पाठिबा दिला आहे. विशेषत: एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी कायम राहावे ही शिंदेसेनेच्या नेत्यांची इच्छा असली तरी फडणवीसांच्या नावाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार की पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे आता दिल्लीतील वरिष्ठ ठरवणार आहेत. आरएसएसनेही फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे तर लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शिंदेंनी आणल्यामुळे त्यातून विधानसभा निवडणुकीत यश मिळालं असं शिंदेसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
आगामी काळात मुंबई महापालिकेसह १४ महापालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या अतिशय महत्त्वाच्या असल्याने तोपर्यंत मुख्यमंत्रिपद आपल्याकडे राहावे असा शिंदेसेनेचा आग्रह आहे. तर भाजपालाही येत्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्रिपद असावे असं वाटते. जागावाटपातही भाजपाने शिंदेसेनेला कमी जागा घेण्याचा आग्रह धरला होता. मात्र शिंदेनी ८० हून अधिक जागा लढण्याचा निर्धार केला. भाजपाने १४८ जागांवर निवडणूक लढवली त्यात ५ जागांवर मित्रपक्षांना उमेदवारी दिली. २०२२ मध्ये घडलेल्या राजकीय उलथापालथी अनपेक्षितपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे भाजपाने मुख्यमंत्रिपद दिले. त्यावेळीही भाजपाचे १०५ आमदार नाराज झाले होते. आताच्या निवडणुकीत भाजपाने १०५ जागांवरून १३२ जागांवर मजल मारली आहे. त्यामुळे ते मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहेत.