मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात महायुती अव्वल ठरली आहे. १३२ जागा जिंकून भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष बनला आहे. निवडणुकीच्या निकालानंतर जरांगे फॅक्टरची चर्चा सुरू आहे. त्यातच जरांगेसोबत जोडले गेलेले एक नाव म्हणजे राजरत्न आंबेडकर...फेसबुकवर साडेसात लाख फॉलोवर्स असलेल्या राजरत्न आंबेडकरांना प्रत्यक्ष निवडणुकीत मिळालेली मते चर्चेचा विषय बनला आहे. निवडणुकीपूर्वी जरांगेंनी महाराष्ट्रात दलित-मराठा-मुस्लीम अशी मोट बांधण्याचा प्रयत्न केला. त्यात ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते सज्जाद नोमानी आणि भारतीय बौद्ध महासभेचे राजरत्न आंबेडकर यांच्यासोबत बैठकाही घेतल्या. या तिघांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्याचीही घोषणाही केली. मात्र काही दिवसांत जरांगे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.
मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण सुरू असताना अनेकदा त्यांची प्रकृती ढासळली. जरांगेंची भेट द्यायला गेलेले राजरत्न आंबेडकर यांच्या डोळ्यातून अश्रू कोसळले. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरलही झाला होता. आधी तिसरी आघाडीचा प्रयोग करणारे राजरत्न आंबेडकर अचानक जरांगेसोबत दिसले. या निवडणुकीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चुलत पणतू म्हणून त्याचं नाव महाराष्ट्रात चर्चेत आलं होतं. त्याच राजरत्न आंबेडकरांनी मनोज जरांगेंसोबत बोलणी फिस्कटल्यानंतर वाशीम मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती.
अपक्ष म्हणून निवडणूक लढवणारे राजरत्न आंबेडकर यांना 'कोट' हे चिन्ह मिळाले. राजरत्न यांनी गावोगावी प्रचारही केला. सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसादही मिळत होता पण प्रत्यक्षात मतमोजणी झाल्यानंतर त्यांना पडलेली मतं अनेकांना आश्चर्य चकीत करणारी होती. ते वाशीम मतदारसंघात केवळ १९४ मतं मिळवत २० व्या क्रमांकावर राहिले. नोटालाही त्यांच्यापेक्षा अधिक मतं मिळाली. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात भाजपाचा आमदार निवडून आला तर याच मतदारसंघात वंचितच्या उमेदवारानेही ९ हजार मतं घेतली. सध्या राजरत्न आंबेडकरांनी मिळालेल्या १९४ मतांची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. फेसबुकवर साडेसात लाख फॉलोवर्स असलेल्या राजरत्न यांना केवळ १९४ मतं मिळणं ही बाब अनेकांना पटलेलं नाही.
विशेष म्हणजे याआधीही राजरत्न आंबेडकरांनी निवडणुका लढवलेल्या आहेत. २००९ मध्ये ते मुरबाड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढले होते, तेव्हा त्यांना ४६०० मतं मिळाली होती. २०१४ मध्ये त्यांनी नांदेड लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका लढवल्या होत्या. तेव्हा त्यांनी लोकसभेला २८००० तर विधानसभेला ५७०० मतं मिळाली होती. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंशी मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता पण ऐनवेळी जरांगेंनी माघार घेतली आणि चर्चा थांबली. त्यावेळी जरांगेंनी मित्रपक्षाची यादी आली नाही, असं कारण दिलं होतं तर राजरत्न आंबेडकर म्हणाले होते की, आमची यादी पाठवलेली होती. जरांगेंनीच माघार घेतली. जरांगेंचे उमेदवार म्हणून राजरत्न आंबेडकर रिंगणात उतरणार होते परंतु या सर्व घडामोडी घ़डल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.